पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल
पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? मंत्री संजय राठोड यांनी संजय देशमुख यांना सवाल केला आहे.
Sanjay Rathod : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मंत्री संजय राठोड यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारावर निशाणा साधला आहे. पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? ठाकरे गटाचे यवतमाळ-वाशिम लोकसभेचे उमेदवार संजय देशमुख यांना मंत्री संजय राठोड यांनी थेट सवाल केला आहे.
भाजप, काँग्रेस असे पाच पक्ष सोडून आता उबाठा मध्ये गेलेल्यांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी संजय देशमुख यांना केला आहे. माजी मंत्री संजय देशमुख हे महाविकास आघाडीचे यवतमाळ-वाशिम लोकसभेचे उमेदवार आहेत.
संजय राठोड हे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि आम्ही त्यांच्या सोबत गेलो. संजय देशमुख यांनी पाच पक्ष बदलून सहाव्यांदा उद्धव ठाकरे गटात पक्ष प्रवेश आहे. पाच वेळा पक्ष बदलून ते स्वत:ला निष्ठावान आणि आम्हाला गद्दार म्हणतात असा टोला संजय राठोड यांनी लगावला.
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी अपक्ष असे पक्ष बदलले. आम्ही चार वेळा आमदार झालो ते फक्त धनुष्यबाण चिन्हावर आणि हे आम्हाला गद्दार म्हणतात. संजय देशमुख हे निवडून तर येणारच नाहीत तर त्यांचा स्वभावही मला माहित आहे. ते तिथंही तीनमहिन्यांच्या राहणार नाहीत ते सोडून पुन्हा दुसऱ्या पक्षात जातील असाही टोला संजय राठोड यांनी महा विकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना लगावला आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीत तिहेरी लढत
यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीतून तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. आता 17 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीकडून राजश्री पाटील, महाविकास आघाडीचे संजय देशमुख आणि बसपाचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.