Suresh Dhas Vs Pankaja Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन भारतीय जनता पार्टीचे आमदारच आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस आणि भाजपाच्याच मंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे. सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत काहीही भाष्य केलं नाही असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. तर पंकजा यांनीही एका मुलाखतीमधून धस यांच्यावर टीका केल्यानंतर धस यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. धस यांनी थेट लेखी तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर यावर पंकजा मुंडेंनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली? याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यावं, असं पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत म्हटलं. यावरुन धस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, "कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात. कुठे जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही," असं उत्तर दिलं आहे.
"मी भाजपाची राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावर थेट आरोप करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना समज द्यावी," अशी अपेक्षा पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत सुरेश धसांबद्दल बोलताना व्यक्त केलेली. "धनंजय मुंडे पालकमंत्री असताना धस आमदार होते. त्यावेळी कराडही काम करत होता. त्यावेळी कराविषयीची एकही तक्रार धस यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे का केली नाही?" असा सवालही पंकजा यांनी उपस्थित केला.
"अचानक मी मंत्री झाल्यानंतर त्यांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं दिसू लागलं? माझा आणि माझ्या पक्षाचा काहीच संबंध नसताना मलाच लक्ष्य का केलं? हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी कारवाईचा शब्द दिलेला असतानाही बाहेर विषय पेटता ठेवण्याचं कारण काय?" असा सवाल पंकजा मुंडेंनी मुलाखतीत सुरेश धसांना विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सुरेश धसांनी, "संतोष देशमुख भाजपचा बुथ प्रमुख होता. त्याच्यासाठी हे प्रकरण मी तेवत ठेवणार," असं म्हणाले आहेत.
"अर्ध्या रस्त्यात असताना आमच्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुखांना फोन लावला. तुम्ही आळात आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तऱ आम्हाला आवडणारा नाही, असं धनंजय देशमुख म्हणाले," असं संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटायला न जाण्याचं कारण सांगताना पंकजा यांनी मुलाखतीत म्हटलेलं. मात्र यावरूनही धस यांनी टीका केली. "संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला त्या (पंकजा मुंडे) भेटायला गेल्या नाहीत. त्या प्रकरणात त्या बोलल्या नाहीत. धनंजय मुंडेंचं पद गेल्यानंतर त्या बोलल्या," असं धस म्हणाले.
अजय मुंडेंनी केलेल्या विधानासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता धस यांनी, "अजय मुंडे हा लहान आहे. माझ्या लेकरासारखा आहे. धनंजय मुंडे यांनी याला त्याला बोलायला लाऊ नये स्वतः बोलावे," असं म्हटलं आहे. "आष्टी मतदारंघात पंकजा मुंडे यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही. आतापर्यंत मी वरिष्ठांकडे तक्रार केली नव्हती आता मात्र लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे," असं धस म्हणाले. त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार का हे पहावं लागणार आहे.
खोक्याला अटक झाल्यानंतर सुरेश धसांनी पंकजा मुंडेंची लेखी तक्रार करणार असल्याचं म्हटल्यानंतर पत्रकारांनी याबद्दल पंकजा यांना प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना पंकजा यांनी, "विनाकारण माझ्या नावाचा वापर केला जात आहे, पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की त्यांनी धसांना समज द्यावी," असं म्हटलं. माझ्यावरील आरोप चुकीचे असल्याचं पंकजा मुंडे माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे. "आपण प्रचार केला नसता तर सुरेश धस प्रचंड मतांनी कसे निवडून आले?" असा सवालही त्यांनी विचारला.