Who Is Walmik Karad: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा मागील तीन आठवड्यांपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून येत आहे. याच प्रकरणासंदर्भात अजित पवारांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हा घटनेच्या 21 दिवसांनंतर आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. वाल्मिक कराड या प्रकरणाशीसंबंधित एका खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहे.
अगदी विधानसभेमध्येही हिवाळी अधिवेशनामधील चर्चेतही वाल्मिक कराडचा उल्लेख करत चर्चा झाल्याचं अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पाहायसला मिळालं. या घटनेनंतर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे नाव वारंवार समोर आल्याने हे नाव फारच चर्चेत असल्याचं दिसून आलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट वाल्मिक कराडांचं नाव घेत ही व्यक्तीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असून त्याला अटक करा अशी मागणी अधिवेशाच्या वेळे केली आहे. 'वाल्मिक कराडचं नाव खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात आलं पण हत्या प्रकरणात नाही,' असं आव्हाड म्हणाले होते. अखेर हा वाल्मिकी कराड शरण आला असला तरी तो नेमका कोण आहे आणि त्याचं बीडमधील राजकीय वजन किती आहे पाहूयात...
> संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामध्ये बीडचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडेही अडचणीत आल्याची अगदी सुरुवातीपासूनच चर्चा आहे. कारण ज्या वाल्मिक कराडचा व त्याच्या नातेवाईकांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे तो वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निटवर्तीय आणि खंदा समर्थक म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये स्थानिकांमध्ये परिचयाचा आहे.
> वाल्मिक कराडचे अगदी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांच्याबरोबरच बीडच्या राजकारणातील मोठ्या नेत्यांबरोबरचे फोटो इन्स्टाग्राम प्रोफाइलवर दिसतात.
> परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद भूषवलेला वाल्मिक कराड पूर्वी गोपीनाथ मुंडेंचा खंदा समर्थक होता. त्यानंतर हळूहळू गोपीनाथ मुंडे यांच्यापासून तो दूर गेला. वाल्मिक कराड मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार स्वत: पाहतोय. धनंजय मुंडे मतदारसंघात नसतात तेव्हा त्यांच्या गैरहजेरीमध्ये परळीत वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतो असं स्थानिक सांगतात. यापूर्वी देखील वाल्मिक कराड कलम 307 सारख्या गुन्ह्यामुळे चर्चेत आला होता. आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडाच्या नातेवाईकांचा संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
> बीडमधील राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह अनेकदा वाल्मिक कराडचे देखील नाव वारंवार घेतले जाते. मात्र यंदाचं प्रकरण हे अधिक गंभीर असून थेट विधानसभेत वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख झाल्याचं दिसून आलं. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट वाल्मिक कराडांचं नाव घेतलं नाही. तरी मुख्यमंत्र्यांनी आरोपी मंत्र्याच्या जवळचा असल्याच्या आरोपावरुनही भाष्य केलं. "आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे. त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. ते तपास करत आहेत, आरोपी मंत्र्यांचे जवळचे आहेत, असे बोलणं योग्य नाही. कारण संबंध नसताना मंत्र्यावर अंगुली निर्देश होत असतो. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत म्हटलं आहे.
> संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज तालुक्यातील विष्णू चाटे हा प्रमुख आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्तीय मानला जातो.