)
Satara Phaltan Doctor Suicide Case: फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न अनुत्तरीत असताना त्या नियमित दैनंदिनी लिहीत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने शवविच्छेदन नोंदीबरोबरच अहवालाच्या दबावाबद्दलचा तपशीलही नमूद केल्याचे तपासात समोर आलं आहे. पोलीस तपासात दबावाबद्दलचा तपशीलही नमूद केल्याचे पुढे आले आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हे आत्महत्या प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांकडून सर्व बाजुंनी तपास सुरू आहे. याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, "या महिला डॉक्टरला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. यामध्ये त्या त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या रोजच्या घटनांची नोंद करून ठेवत होत्या. यामध्ये व्यक्तीगत गोष्टींपासून ते शवविच्छेदन अहवालाच्या नोंदीदेखील त्यांनी नोंद करून ठेवलेल्या आहेत. या डायरीमुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल." याशिवाय मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर पोलीस, डॉक्टर व राजकारण्यांकडून कसा दबाव येत होता, याबाबतची नोंद देखील या डायरीमध्ये असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
संबंधित महिला डॉक्टर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी होत्या. त्यांनी फलटणशिवाय सातारा जिल्ह्यात इतर ठिकाणीही कालावधीसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांच्याकडून या महिला डॉक्टरांबाबत माहिती गोळा केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस तपासात डॉक्टर महिला ही दोन्ही संशयित आरोपी यांच्याशी संपर्कात होती अशी माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यासोबत डॉक्टर महिलेचे बोलणे आणि चॅटिंग सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे मात्र फायनल शवविच्छेदन अहवाल प्राप्त व्हायचं आहे असं देखील पोलिस अधीक्षक यांनी सांगितले आहे.
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून माजी भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर थेट विरोधकांकडून आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया नोंदवली आहे. "कोण काय बोललं हे मला माहित नाही, पण आरोप करणं हे फार सोपं असतं. मात्र सगळं सखोल चौकशी होऊन सत्य उघडकीस येईपर्यंत निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. तपास यंत्रणेला आपलं काम करू द्या. आम्हीही गप्प बसलेलो नाही. निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं काम मी करेन," असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.