तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पोळकडे मोबाईल, रिव्हॉल्वर?
सहा खूनप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संतोष पोळकडे मोबाईल, रिव्हॉल्वर?
कोल्हापूर : धक्कादायक बातमी. कोल्हापुरातल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या ढिसाळ कारभाराची. वाईचा 'कसाई' अशी ओळख असलेला संतोष पोळ या न्यायालयात तुरूंगवास भोगतोय. या संतोष पोळनं वाईमध्ये तब्बल ६ खून करून त्या मृतदेहांची परस्पर विल्हेवाट लावली होती. आपल्या घराच्या मागेच खड्डे खोदून त्यात हे मृतदेह पुरले होते. या संतोष पोळचे तुरूंगाच्या कोठडीतले व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती लागलेत.
धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये तो रिव्हॉल्वरसदृश वस्तू घेऊन कोठडीत वावरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. संतोष पोळने स्वतःच मोबाईल फोनच्या माध्यमातून हे व्हिडिओ शूट केलेत. एवढंच नव्हे तर या मोबाईल फोनच्या माध्यमातून त्यानं स्वतःची मुलाखत देखील शूट केल्याचं समजतंय. तुरूंगवास भोगत असलेल्या या पोळकडं चित्रिकरणासाठी मोबाईल फोन कुठून आला? तसंच त्याच्याकडं आढळलेली रिव्हॉल्वरसदृश वस्तू ही खरीखरी रिव्हॉल्व्हर आहे की खोटी? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
तुरूंग अधिकारी चंद्रकांत आवळे यांनीच आपल्याला ही रिव्हॉल्व्हर दिली, असा गौप्यस्फोट संतोष पोळनं या व्हिडिओ क्लीपमध्ये केलाय. हा दावा कितपत खरा आहे? सहाजणांची अत्यंत क्रूरपणं हत्या करणाऱ्या संतोष पोळसारख्या सिरीयल किलरकडं मोबाईल आणि रिव्हॉल्व्हरसारख्या वस्तू कुणी पोहचवल्या, असे अनेक सवाल यानिमित्तानं केले जातायत. या व्हिडिओ क्लीपमुळं कळंबा कारागृहाच्या कारभाराची लक्तरं वेशीवर टांगली गेलीत.