अतिवृष्टी अनुदानात घोटाळा, तलाठ्यांनी खाल्ले शेतकऱ्यांचे पैसे

सरकारनं शेतक-यांना सानुग्रह अनुदान मंजूर केलं होतं. पण ते शेतक-यांपर्यंत पोहोचलंच नाही. कारण ग्रामसेवक, तलाठी तसंच कृषी सहाय्यकांनी त्यावर डल्ला मारल्याचं समोर आलंय. 

पुजा पवार | Updated: Apr 15, 2025, 07:03 PM IST
अतिवृष्टी अनुदानात घोटाळा, तलाठ्यांनी खाल्ले शेतकऱ्यांचे पैसे
(Photo Credit : Social Media)

नितेश महाजन (प्रतिनिधी) जालना : अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे जालना जिल्ह्यात मोठं नुकसान झालं. सरकारनं शेतक-यांना सानुग्रह अनुदान मंजूर केलं होतं. पण ते शेतक-यांपर्यंत पोहोचलंच नाही. कारण ग्रामसेवक, तलाठी तसंच कृषी सहाय्यकांनी त्यावर डल्ला मारल्याचं समोर आलंय. 

सप्टेंबर महिन्यात जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. पिकांचा डोळ्यांदेखत चिखल झाला. हतबल झालेल्या शेतक-याला सरकारनं मदतीचा हात दिला. साडेतेरा लाख लाभार्थी शेतक-यांना नुकसान भरपाईपोटी अनुदान म्हणून 1550 कोटी रुपयांचा निधी दिला. अनुदान वाटप सुरू झालं. शेतक-यांना भरपाई मिळालीच नाही..उलटपक्षी अनुदान वाटप करताना तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक मालामाल झाले. या घोटाळ्याच्या तक्रारी मिळताच 
जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले. 

नेमका हा घोटाळा काय आहे?

1. जालन्यात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान
2. सरकारकडून 1550 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
3. शेतक-यांना नुकसान भरपाई न मिळाल्यानं तक्रारी
4. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी अतिवृष्टी अनुदानात घोटाळा
5. बोगस शेतकऱ्यांच्या नावे अनुदान वळवलं
6. अंबड, घनसावंगी तालुक्यातून घोटाळ्याच्या सर्वाधिक तक्रारी
7. त्रिस्तरीय चौकशीचे जिल्हाधिका-यांचे आदेश
8. तक्रारीत तथ्य असून महिन्याभरात अहवाल मिळेल,अप्पर जिल्हाधिका-यांची माहिती

दरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून जबाबदार अधिका-यांवर कारवाईची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. अतिवृष्टी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारीनंतर, जिल्हाधिका-यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन केलीय. गेल्या अनेक महिन्यांपासून नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानाची वाट पाहत होते. पैसे तर मिळाले नाहीच मात्र ते तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी लाटले हे कळताच शेतकरी आक्रमक झालेत. सरकार मदत करतं.. पण ती या घोटाळेबाज अधिका-यांमुळे शेतक-यांच्या हाती पडत नाही. या घोटाळेबाजावर कारवाई होईल ती होईल पण तोपर्यंत काळ सोकावतो.