'हे' गाव जिथे दरवाजे नाहीत, बँकेलाही कुलूप नाही; साक्षात देवचं करतात गावाचं रक्षण!

भारतात विविध प्रकारची गावं आहेत काही ऐतिहासिक, काही सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची, तर काही त्यांच्या अंधश्रद्धा किंवा श्रद्धा यासाठी ओळखली जातात. अशाच गावांपैकी हे गाव आहे, जिथे कोणत्याही घराला, दुकानाला, अगदी बँकेलाही दरवाजे किंवा कुलूप नसतात. पाहूयात हे अनोखं गाव.  

Intern | Updated: May 17, 2025, 05:03 PM IST
'हे' गाव जिथे दरवाजे नाहीत, बँकेलाही कुलूप नाही; साक्षात देवचं करतात गावाचं रक्षण!

Shani Shingnapur: महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात, नेवासा तालुक्यात वसलेलं हे गाव शनिदेव महाराजांच्या प्रचंड श्रद्धेसाठी ओळखलं जातं. गावात शनिदेवाचं प्राचीन मंदिर आहे. येथे दररोज हजारो भक्त येतात. विशेष म्हणजे, शनिदेवाची मूर्ती कोणत्याही गाभाऱ्यात नाही, ती मोकळ्या जागेत एका चौथऱ्यावर ठेवलेली आहे.

लोकांच्या मते, शनिदेव इथे जागृत आहेत. म्हणजे ते केवळ मूर्तीत न राहता प्रत्यक्ष गावाचं संरक्षण करतात. त्यामुळेच येथे चोरी किंवा गुन्हा करण्याची कोणाची हिंमत होत नाही.

दरवाजे का नाहीत?
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, शनीदेवाची कृपा असलेलं हे गाव आहे, म्हणून कोणत्याही घराला दरवाजे लावण्याची गरज वाटत नाही. घरात किंमती वस्तू, पैसे, दागिने असले तरीही लोक घरं उघडी ठेवूनच निघून जातात.

एक जुनी कथा अशी आहे की पूर्वी एका व्यक्तीने गावातून चोरी केली होती आणि नंतर त्याच्या कुटुंबावर अनेक संकटं आली. तेव्हापासून लोकांनी असा विश्वास बाळगायला सुरुवात केला की, इथे चोरी केल्यास शनिदेव लगेच शिक्षा करतात. त्यामुळे चोरही गावात चोरी करण्यास घाबरतात.

बँकेलाही कुलूप नाही
यूको बँकेने 2011 साली या गावात एक अनोखी शाखा सुरू केली. ही भारताची पहिली 'लॉकलेस' बँक शाखा आहे. बँकेच्या दाराला कुलूप लावलेलं नाही. येथे कधीही चोरी झाली नाही. ही शाखा स्थापण्यामागे बँकेचं मत होतं की, स्थानिक श्रद्धेला आदर देणे आणि त्या परंपरेचा सन्मान करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

गावातील इतर वैशिष्ट्ये
1. अत्यंत स्वच्छ गाव: भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे गावात स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जातं.
2. प्रदूषणमुक्त आणि शांत: येथे सण, यात्रा आणि पूजा यामध्येही गोंगाट कमी असतो.
3. स्त्रियांना मंदिरात प्रवेशाची मुभा नव्हती, पण काही वर्षांपूर्वी महिलांनी आंदोलन करून त्यांचाही प्रवेश सुरू केला. यावरून इथल्या परंपरेत थोडा बदल झालेला दिसतो.
4. गावातील लोक मुख्यतः शेती, छोट्या व्यवसायात गुंतलेले आहेत.

येथे पादचारी दर्शनाचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे वाहनं मंदिरापर्यंत जात नाहीत. मंदिरात काळ्या कपड्यांची प्रथा आहे. कारण काळा रंग हा शनिदेवांचा आवडता रंग मानला जातो. शनिवारी येथे विशेष पूजा-अभिषेक होतो आणि त्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते.

शनि शिंगणापूर हे गाव म्हणजे श्रद्धा, आत्मविश्वास आणि सामाजिक एकोप्याचं जिवंत उदाहरण आहे. जिथे लोक दरवाज्याशिवायही निश्चिंत राहतात आणि बँकेलाही कुलूप लावत नाही. येथे श्रद्धा आणि शिस्त या दोन्ही गोष्टीचं खूप पालन केलं जातं.