शरद पवार अमित शहांबद्दल असं म्हणाले तरी काय? भाजपने थेट लवासाची फाईल काढू असा इशारा दिला

सध्या अमित शहा आणि शरद पवारांमध्ये चांगलीच जुंपलीय. अमित शहांनी शिर्डीतल्या भाजप अधिवेशनात शरद पवारांनी गद्दारीचं राजकारण केल्याचा आऱोप केला. त्यानंतर पवारांनी अमित शहांचं गुजरातमधलं बहुचर्चित प्रकरणच उकरुन काढलंय. त्यामुळं भाजपचा संताप झालाय. नेमकं काय घडलंय.

वनिता कांबळे | Updated: Jan 14, 2025, 09:45 PM IST
  शरद पवार अमित शहांबद्दल असं  म्हणाले तरी काय? भाजपने थेट लवासाची फाईल काढू असा इशारा दिला

Sharad Pawar On Amit Shah : विधानसभा निवडणुका संपल्या, महायुतीचं सरकार पुन्हा आलं. मात्र त्यानंतरच्या शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शहांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती. गद्दारीच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खोल गाडल्याचा टोला अमित शाहांनी शरद पवारांना लगावला होता.

Add Zee News as a Preferred Source

अमित शहा यांच्या टीकेला आता शरद पवारांनी तशाच जहरी शब्दात उत्तर दिलंय. केंद्रीय गृहमंत्रिपदाची देशाला मोठी परंपरा लाभलीये. वल्लभभाई पटेलांपासून यशवंतराव चव्हाणांनी देशाचं गृहमंत्रिपद भूषवलं पण तडीपार राहिलेला माणूस पहिल्यांदाच गृहमंत्रिपदावर बसल्याचा टोला शरद पवारांनी लगावलाय.

शरद पवार फक्त इतक्यावरच थांबले नाहीत.. तर त्यांनी अमित शहांना अजून डिवचलं. हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने जागा दाखवली अशी टीका अमित शाहांनी केली होती. त्याला उत्तर देताना त्यांनी बाळासाहेबांनी कसा अमित शहांना आश्रय दिला होता त्याचा किस्सा सांगितला.  पवारांच्या या आरोपांमुळे आता भाजपचं पित्त जास्तच खवळलंय. तुम्ही जर अमित शहांच्या जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हाला पण लवासाची फाईल उघडायला लावू नका असा इशाराच आता आशिष शेलारांनी दिलाय.

लोकसभेवेळी भटकती आत्मा असा शरद पवारांचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी सभेत केला.. त्याचा मोठा फटका त्यांना निवडणुकीत बसला. त्यातून धडा घेत विधानसभेवेळी कसली जहरी टीका शरद पवारांवर होणार नाही याची काळजी भाजपनं घेतली. मात्र विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाजपनं शरद पवारांना टार्गेट करायला सुरुवात केलीय. मात्र अमित शहांच्या जहरी आरोपांना शरद पवारांनी तितक्याच कठोर शब्दात उत्तर दिलंय. मात्र हे आरोपांचं राजकारण नेमकं कुठवर जातंय ते बघावं लागेल. बात निकली है तो दूरतक जाएगी, इतकं मात्र नक्की.. 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More