महाराष्ट्रातील मोठी घडामोड! शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आमने-सामने, नेमकं काय घडलं?

Sharad Pawar Meets Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली आहे. बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये ही भेट झाली.   

शिवराज यादव | Updated: Feb 4, 2026, 06:32 PM IST
महाराष्ट्रातील मोठी घडामोड! शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आमने-सामने, नेमकं काय घडलं?

Sharad Pawar Meets Sunetra Pawar: अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पवार कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. सुनेत्रा पवार यांनी या धक्क्यातून सावरत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शरद पवारांनी आपल्याला सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची काही कल्पना नाही असं सांगितल्यानंतर त्यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली होती. शपथविधीनंतर शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात काही संभाषण किंवा भेट झाली नव्हती. दरम्यान आज पहिल्यांदाच शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने आले होते.

Add Zee News as a Preferred Source

अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, शरद पवार, जय पवार, नीता पाटील, विजया पाटील, श्रीनिवास पवार, रोहित, राजेंद्र, रणजित पवार असे सर्वजण उपस्थित असून, सर्वांच्या भेटी घेत आहेत. शरद पवारही तिथे पोहोचले असून, यावेळी तेदेखील खुर्चीत बसून पवार कुटुंबासह शोकसभेसाठी आलेल्या सर्वांची भेट घेताना दिसले. शोकसभेच्या निमित्ताने शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने आले होते. दरम्यान यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली हे समोर आलेलं नाही.  

राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच?

अजित पवारांनंतर आता राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारच सांभाळणार हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. कारण अमोल मिटकरी यांनी अध्यक्षपदाबाबत मोठं विधान केलं आहे. तसंच धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील सुनेत्रा पवारांनाच अध्यक्ष करण्याची मागणी होत असल्याचं म्हटलं आहे.

अजित पवारांनंतर राष्ट्रवादी अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवारच सांभाळणार हे निश्चित मानलं जात आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. सुनेत्रा पवारांनाच अध्यक्ष करावं अशी मागणी राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात दुसरा कोणताही नेता आता अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबतची स्पष्टता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील सुनेत्रा पवारच अध्यक्षा होणार असं मत व्यक्त केलं आहे. सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करण्यावर एकमतानं निर्णय होईल असंही यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी पक्षात नव्या अध्यक्षाची निवड कशी होते?

-राष्ट्रवादीच्या घटनेतील कलम 20 नुसार अध्यक्षाची निवडणूक होते
-केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूक घेतली जाते
-पक्षातील कोणतेही दहा अधिकृत प्रतिनिधी उमेदवार होऊ शकतात
-NCP विधिमंडळ पक्षातून निवडलेल्या 5% सदस्यांना मतदानाचा अधिकार
-एकच उमेदवार असेल तर अध्यक्षांची बिनविरोध घोषणा 
-दोन किंवा अधिक उमेदवार असतील तर गुप्त पद्धतीनं मतदान
- दोन उमेदवारांचं एक मत अशी मतदानाची रचना
-50% पेक्षा जास्त मतं मिळालेला उमेदवार अध्यक्ष ठरतो
-अध्यक्षांचे अकाली निधन झाल्यास किंवा राजीनामा दिल्यास पक्षाचे अधिकार वरिष्ठ महासचिवांकडे
-वरिष्ठ महासचिव तात्पुरते अध्यक्षीय कामकाज पाहतात

प्रफुल पटेलही राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या रेसमधून बाहेर पडले आहेत. त्यांनी स्वत: यासंदर्भातली घोषणा केलीय. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांनीच अध्यक्षपदाची सूत्र हाती घ्यावी अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा आहे.. त्यामुळे सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील हे जवळजवळ निश्चित मानलं जातंय...

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More