'6 महिन्यात आणखी एक विकेट जाणार,' सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, 'जो बायकोच्या आड...'

Supriya Sule Speech: राज्यात आणखी एक राजकीय भूंकप होणार असल्याची शक्यता पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान करत व्यक्त केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 17, 2025, 11:11 AM IST
'6 महिन्यात आणखी एक विकेट जाणार,' सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, 'जो बायकोच्या आड...'
सुप्रिया सुळेंचा इशारा कोणाच्या दिशेने?

Supriya Sule Speech: राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या कन्या तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यामध्ये पुढील सहा महिन्यात मोठा राजकीय भूकंप होईल असं सूचक विधान केलं आहे. ‘बरे झाले पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबरच काम करणे शक्य नाही,‘‘ अशा शब्दात धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी जोरदार टीका केली. राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना, "शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे," असं सूचक विधानही सुप्रिया सुळेंनी केलं आहे. त्यामुळे आता पुढील सहा महिन्यात नेमका कोणता मंत्री आणि कोणत्या कारणाने अडचणीत येणार याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.

मला मिळालेल्या माहितीनुसार...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना सुप्रिया सुळेंनी बीड प्रकरणावरुन भाष्य केलं. "बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांची घरी भेट एकदा तरी जाऊन या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाले. पुढे बोलताना सुप्रिया यांनी, ‘‘मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यामध्ये देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना फोन आले होते. त्यांची हे गंमत बघत होते, किती ही विकृती आहे. हे वास्तव आहे. अवादा कंपनीला काम देऊ नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्रं दिली आहेत. पत्रंही यांनीच द्यावयाची, खंडणीही यांची गोळा करायची, या आकाचा आका तोच आहे," असंही म्हटलं.

छोट्यांना घेरण्यापेक्षा जे ‘डबल डेंजर’ आहेत, त्यांच्याशी...

राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावरही सुप्रिया सुळेंनी टीका केली. ‘‘मतदारांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते. शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिम्मत असेल, तर समोर येऊ लढ. ही लाढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे ‘डबल डेंजर’ आहेत, त्यांच्याशी लढण्यात मजा आहे,’’ असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी पुढील भविष्यवाणी करताना केलं.

धनंजय मुंडेंचा राजीनामा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर वाढत्या दबावापुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि धनंजय मुंडेंनी 4 मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.