Shirdi Sai Sansthan: शिर्डी साई भक्तांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. शिर्डीच्या साई दरबारात भक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही साई संस्थानला किती देणगी देता? यावरुन तुम्हाला तिथे कोणत्या सुविधा मिळतील हे ठरणार आहे. साईबाबा संस्थानच्यावतीने सुधारित सुविधा धोरण आणण्यात आलंय. साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने सुधारित देणगी धोरणास मान्यता दिली आहे. काय आहे हे धोरण? सविस्तर जाणून घेऊया.
साई भक्तांना देणगीनुसार दर्शन आणि आरती पास, प्रसाद, पूजेचे कूपन्स, सन्मानचिन्हे या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. याचे दर जाहीर करण्यात आले आहेत. व्हीहीआयपी दर्शन आणि वस्त्र अर्पण याचादेखील यात समावेश आहे.
10 हजार ते 24 हजार 999 रुपये भरल्यास 5 सदस्यांसाठी एक वेळचा आरती पास अशी सुविधा मिळणार आहे. देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पास, प्रसाद, पूजेचे कुपन्स, सन्मानचिन्हे यांचा लाभ मिळणार असल्याची माहिती संस्थानच्यावतीने देण्यात आली.
25 हजार ते 50 हजार रुपये देणगी भरणाऱ्या साई भक्तांना मंदिरात 2 वेळा आरती/दर्शन पास, थ्रीडी पॉकेट फोटो, 5 उदी, 1 साई चरित्र, 2 लाडू प्रसाद दिले जाणार आहेत. 50 हजार 1 ते 99 हजार 999 रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना 2 व्हीव्हीआयपी आरती पास, सन्मानचिन्हे ही सुविधा मिळणार आहे.
1 लाख ते 9.99 लाख रुपये देणगी दिल्यास पहिल्या वर्षी 2 आणि पुढील वर्षासाठी प्रत्येकी 1 व्हीव्हीआयपी पास, एक वेळचे वर्षातून मोफत दर्शन, सन्मान शॉल, 3 फोटो, पूजेचे कूपन, भोजन पास, वस्त्र व प्रसाद भेट म्हणून दिली जाणार आहे.
जे देणगीदार 10 लाख ते 50 लाख रुपये भरल्यास त्या भाविकांना प्रत्येक वर्षी 2 व्हीव्हीआयपी आरती पास, वर्षातून एक वेळ मोफत प्रोटोकॉल दर्शन, साईबाबांना वस्त्र अर्पणाची संधी, वस्त्र भेट, साई मूर्ती, पूजेचे कूपन्स, भोजन पास, अशी सुविधा दिली जाणार आहे.
50 लाखांहून अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना आयुष्यभर दरवर्षी 3 व्हीव्हीआयपी आरती, दोन प्रोटोकॉल दर्शन पास, वस्त्र अर्पण, साई मूर्ती, सन्मान चिन्हे, भोजन पास अशी सुविधा मिळणार आहे. संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.