समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण, पुढील महिन्यात वाहतुकीसाठी होणार खुला
Maharashtra Samruddhi Mahamarg : शिर्डी ते नागपूर हा समृद्धी महामार्गाचा एक मार्ग सुरु झाल्यानंतर दुसरा एक मार्ग सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा मार्ग मे महिन्यात सुरु होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
Maharashtra Samruddhi Mahamarg : अमर काणे / नागपूर : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा सुरु होणार आहे. शिर्डी ते नागपूर हा समृद्धी महामार्गाचा एक मार्ग सुरु झाल्यानंतर दुसरा एक मार्ग सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिर्डी ते भरवीर 80 किमीच्या समृद्धीमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा मार्ग मे महिन्यात सुरु होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटरचे काम पूर्ण !
शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटरचा मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मे महिन्यात शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा समृद्धी मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटरचा समृद्धीवरील मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन एम एसआरडीसी करीत आहे. तसे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली.
शिर्डी ते मुंबई या टप्प्याच्या कामाचा वेग वाढवला
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील डिसेंबर 2022 ला नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शिर्डी ते मुंबई या टप्प्याच्या कामाचा वेग वाढवला आहे. त्यानुसार शिर्डी ते भरवीर अशा 80 किमीच्या महामार्गाचे काम जवळपास झाले आहे. त्यामुळे हा टप्पा वाहतुकीस खुला करण्याचे एमएमआरडीसीचे नियोजन आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते नाशिक प्रवास पाच ते साडेपाच तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
नागपूर - शिर्डी असा 520 किमीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या विक्रमी वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर विक्रमी टोल वसूली झाली आहे. तसेच या महामार्गावर अपघाचे प्रमाणही वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वेग मर्यादा याच्यावर नियंत्रण आणण्यात आले आहेत. या महामार्गावरुन ताशी 120 किमी वेगाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे नागपूर ते शिर्डी अंतर केवळ पाच तासांत पूर्ण करणे शक्य होत आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. तसेच समृद्धी महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता गाड्यांचे टायर घासले असल्यास प्रवेश मिळणार नाही. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे.