बिबट्यांची दहशत महिलांची शक्कल, बिबट्यापासून संरक्षण व्हावं म्हणून गळ्यात खिळे असलेले पट्टे

गेल्या अनेक दिवसांपासून इथले ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. आतापर्यंत 57 हून अधिक जणांचा बळी बिबट्यानं घेतलाय.

पूजा पवार | Updated: Nov 9, 2025, 08:22 PM IST
बिबट्यांची दहशत महिलांची शक्कल, बिबट्यापासून संरक्षण व्हावं म्हणून गळ्यात खिळे असलेले पट्टे
(Photo Credit : Social Media)

हेमंत चापुडे (प्रतिनिधी) पुणे : शिरूरकरांसाठी रात्र सोडा आता दिवसही वै-याचाच झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून इथले ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. आतापर्यंत 57 हून अधिक जणांचा बळी बिबट्यानं घेतलाय. त्यामुळे घरातून बाहेर पडताना जीव मुठीत धरून त्यांना वावरावं लागतंय. पण कामासाठी बाहेर तर पडावंच लागणार म्हणून इथे ग्रामस्थांनी एक अनोखी शक्कल लढवलीय.

Add Zee News as a Preferred Source

कधी, कुठे दबा धरून बसलेला बिबट्या समोर येईल आणि हल्ला करेल, याचा हल्ली नेम नाही. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणारे, शेतात काम करणारे सर्वांनाच बिबट्याची भीती आहे. उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय. आतापर्यंत 57 जणांना बिबट्याच्या हल्लात प्राण गमवावा लागलाय. पण घरातच बसलं तर पुढे करायचं काय, खायचं काय? हा प्रश्न आहे. त्यामुळे भीत भीत हे ग्रामस्थ कामासाठी बाहेर पडतात.  शेतात ऊसतोडणी करणा-या या महिलाही दहशतीखाली आहेत. पण या बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावं, यासाठी शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथल्या महिलांनी अनोखी शक्कल लढवलीय. गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टे या महिलांनी घातलेत. बिबट्या प्रामुख्यानं मानेवर हल्ला करतो. पण टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं, असं या महिलांचं म्हणणंय. 

पुण्यात बिबटे टोळीनं वावरतायेत, यामुळं बिबट्यांची संख्या किती वाढलीय, हे यातून दिसतंय. दहा चौरस किलोमीटरच्या परिघात एक बिबट्या अशी संख्या वन विभागानं गृहीत धरलीय. मात्र जुन्नरमध्ये एकाचवेळी तीन-तीन बिबटे आढळलेत. त्यामुळं बिबट्यांची संख्या उत्तर पुणे जिल्ह्यात वाढलीय, हे स्पष्ट झालंय. वारंवार ग्रामस्थांवर होणारे हल्ले हा तर चिंतेचा विषय बनलाय. हेच बिबटे गुजरातच्या वनतारासह विविध राज्यात स्थलांतरित केले जाणार असं सांगितलं होतं. मात्र ते स्थलांतरित कधी करणार? असा प्रश्न भयभीत ग्रामस्थ विचारत आहेत. सध्या गळ्यात खिळे असलेला लोखंडी पट्टा बांधला खरा पण तरीही भय इथले संपत नाही असंच म्हणावं लागेल. 

FAQ : 

शिरूर तालुक्यातील ग्रामस्थांना बिबट्याच्या हल्ल्याचा किती वेळा सामना करावा लागला आहे?
आतापर्यंत 57 हून अधिक जणांचा बळी बिबट्यानं घेतलाय.

बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी ग्रामस्थांनी काय उपाय केला आहे?
गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टे घातले आहेत.

उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या किती आहे?
दहा चौरस किलोमीटरच्या परिघात एक बिबट्या अशी संख्या वन विभागानं गृहीत धरलीय.

जुन्नरमध्ये किती बिबटे आढळले आहेत?
एकाचवेळी तीन-तीन बिबटे आढळले आहेत.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More