कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर कथित वादग्रस्त गाणं! मुंबईत तुफान राडा; शिवसैनिकांकडून क्लबची तोडफोड

Kunal Kamra Remarks On Maharashtra DCM Eknath Shinde: एकनाथ शिंदेंबद्दल अप्रत्यक्षपणे केलेल्या वादग्रस्त विधानावरुन मुंबई रविवारी रात्री मोठा राडा झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 24, 2025, 02:58 PM IST
कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर कथित वादग्रस्त गाणं! मुंबईत तुफान राडा; शिवसैनिकांकडून क्लबची तोडफोड
खारमधील क्लब फोडला (फोटो एक्सवरुन साभार)

Kunal Kamra Remarks On Maharashtra DCM Eknath Shinde: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आपल्या स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये त्याने सूचक पद्धतीने वादग्रस्त विधान केल्याने रविवारी रात्री मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. कुणाल कामराने मुंबईतील खार येथील युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमधील 'द हॅबिटॅट क्लब'मध्ये हा शो घेतला तिथे एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घालत तोडफोड केली आहे. या क्लबमधील सेटची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये 40 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कुणालविरोधात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. हे प्रकरण आज दिवसभर तापणार अशी चिन्हं दिसत आहेत. 

शिंदेंवर टीका केल्यानंतर ठाण्यात पोलीस स्टेशनबाहेर जाळपोळ

एका कार्यक्रमात कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध अप्रत्यक्षपणे केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेच्या सदस्यांनी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये निदर्शने केली. एकनाथ शिंदेंचं खासगी निवासस्थान ज्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतं त्या पोलीस स्टेशनसमोर कुणाल कामराचे फोटो शिवसैनिकांनी जाळले.

खार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली तक्रार

एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक गाणे प्रकाशित केल्याबद्दल युवा सेनेचे सरचिटणीस राहूल कनाल यांनी कुणाल कामराविरोधात खार पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. 

संजय राऊतांना टॅग करत महिला नेत्याची टीका

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना टॅग करुन निशाणा साधला आहे.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरुन कुणाल कामराचा क्लब फोडला! राऊतांचा CM वर निशाणा; म्हणाले, 'देवेंद्रजी, तुम्ही...'

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा हा तोच भामटा कुणाल कामरा. बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामराने एकनाथ शिंदे साहेबांची माफी मागावी नाहीतर हा असंगाशी संग करणाऱ्या कामराला आणि त्याच्या 'आका'ला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागणार हे नक्की," असं शितल म्हात्रे म्हणाल्या आहेत. 

अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

कुणाल कामारा विरोधात अंधेरीमधील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार मुरजी पटेल यांचा जबाब घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला आहे. शिवसैनिकांची अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमली होती. 

कुणाल कामराची नवी पोस्ट

कुणाल कामराने शिंदेंवर टीका केल्यानंतर वाद सुरु झाल्याने त्याने हातात संविधानाची प्रत पकडलेला स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. 'पुढे जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे,' असं कुणालने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

कुणाल कामरा यापूर्वीही पत्रकार अर्नब गोस्वामीवर टीका केल्याने, ओलाविरोधात मोहीम सुरु केल्याने चर्चेत आला होता.