Aditya Thackeray on Alliance with MNS: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष एकत्र येण्यासंदर्भात चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशी इच्छा गेली अनेक वर्षं महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे. पण शिवसेना सोडल्यानंतर वेगळी चूल मांडलेल्या राज ठाकरेंनी राजकारणात मात्र उद्धव ठाकरेंपासून दोन हात लांब राहणंच पसंत केलं. इतकंच नाही तर बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोपही केले. मात्र नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी आपण महाराष्ट्र हितासाठी युती करण्यास तयार असल्याचं विधान केलं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भातील चर्चांना उधाण आलं. त्यातच आता आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात विधान केलं आहे.
आदित्य ठाकरेंनीा राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनीही महाराष्ट्र हितासाठी कोणीही आलं तरी एकत्र येऊ असं म्हटलं आहे. "उद्धव साहेबांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे. जे महाराष्ट हितासाठी सोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. सेटिंग राजकारण नाही, तर आम्ही स्वच्छ दिलाने एकत्र यायचं ठरवत आहोत. कोण टाळी देतं, कोण साथ देतं आहे हे सुरू राहणार आहे. महाराष्ट्र हितासाठी कुणीही आले तरी एकत्र येऊ," असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्रित येऊन महाराष्ट्राला ठाकरे पर्व पाहायला मिळेल, अशी आशा मनसैनिक आणि शिवसैनिकांना होती. मात्र आता ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. राज ठाकरेंनी पुन्हा पुढाकार घ्यावा असं अवाहन त्यांना संजय राऊतांनी केलं होतं. मात्र त्यांच्या अवाहनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, युतीच्या भरवशावर राहू नका, असंदेखील राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांकडून युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर आहे. परदेश दौऱ्यावरुन दोन्हीही नेते परत आले आहेत. मात्र अद्यापही युतीच्या बाबतीत कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत. अशातच राज ठाकरेंनी आता कार्यकर्त्यांना युतीबाबतीत आता बोलू नका, अशा सूचना दिल्या आहेत. युतीबाबतचा जो काही निर्णय आहे तो आपणच घेऊ, असे आदेशदेखील राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या आहेत. युतीबाबतच्या चर्चांकडे लक्ष न देता आता कामाला लागा, असे स्पष्ट आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत.