`एकनाथ शिदेंचा चेहरा घेऊन आपण...`, संजय शिरसाट स्पष्टच बोलले, म्हणाले `फडणवीसांच्या बाबतीत...`
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते आपला मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी करत आहेत. यादरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं आहे.
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते आपला मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रपीदाचा राजीनामा दिला असून, राज्यपालांनी त्यांना नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री जाहीर केलं आहे. यादरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री का व्हावेत यावर भाष्य केलं आहे.
"26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करणं बंधनकारक होतं. राजीनामा देणं हा त्याचाच एक भाग आहे. म्हणूनच एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होऊन आणि आमचे वरिष्ठ नेते मोदी, अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यावर मुख्यमंत्री कोण हे जाहीर होईल. म्हणूनच त्यासंबंधी कोणतीही हालचाल किंवा चर्चा झालेली नाही. कोणाच्याही नावाची घोषणा झालेली नाही," अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.
तिन्ही नेते आज संध्याकाळी याबाबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतील. आज रात्री उशिरापर्यंत किंवा सकाळी मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागली हे जाहीर करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
"मुख्यमंत्रीपदी आपला नेता बसावा अशी प्रत्येक नेते, कार्यकर्ते यांची मनापासून इच्छा आहे. शिंदेचा चेहरा घेऊन आपण ही निवडणूक लढलो आहोत त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी होत आहे. त्यांनी आणलेल्या योजना यशस्वी झाल्या आहेत. सर्व्हेतही त्यांना जास्त पसंती मिळाली आहे, त्यामुळे त्यांचं नाव सुचवण्यात काही गैर नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही काही वेगळं नाही. त्यांना जास्त जागा जिंकल्याने मागणी होत आहे. आमदार, नेते, कार्यकर्ते यांच्या भावना आहेत. पण या बाबी असल्या तरी पालिका निवडणुका आणि इतर गोष्टी पाहता एकनाथ शिंदे सक्षम आहेत. म्हणून त्यांच्या नावाला जास्त पसंती मिळत आहे. तरी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. महायुतीचं सरकार अत्यंत खंबीरपणे, जोमाने काम करेल अशी अपेक्षा आहे," असंही ते म्हणाले आहेत.
"रामदास आठवले का बोलत आहेत याची कारणं सांगता येणार नाही. पण या प्रक्रियेत त्यांची काय भूमिका नाही. त्यामुळे ज्यांची भूमिका आहे ते बोललं तर त्याला वेगळं महत्त्व असतं," असं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही सर्व एक असून, प्रत्येकाचा एकमेकाला पाठिंबा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काय घडणार आहे किंवा काय घडेल यासंबंधी फक्त वरिष्ठ निर्णय घेतील. माझ्या किंवा इतर पक्षांच्या आमदारांच्या मताला अधिकृत म्हणता येणार नाही, ते वैयक्तिक मत असतं. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि तीन नेते मिळून जो काही निर्णय घेणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. अमित शाह मुंबईला येणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं.