'ही मोदींना मारलेली चपराक,' ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानल्याने राऊतांचा संताप; 'महाविश्वगुरुंमुळे भारताची अवस्था डरपोक उंदरासारखी'

Sanjay Raut on US Iran Ceasefire: अमेरिका-इराण यांच्यात मध्यस्थी करत शस्त्रसंधी केल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला आहे. भारतासाठी हा लाजिरवाणी गोष्ट आहे असा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 8, 2026, 11:00 AM IST
'ही मोदींना मारलेली चपराक,' ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानल्याने राऊतांचा संताप; 'महाविश्वगुरुंमुळे भारताची अवस्था डरपोक उंदरासारखी'

Sanjay Raut on US Iran Ceasefire: अमेरिका-इराण यांच्यात मध्यस्थी करत शस्त्रसंधी केल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला आहे. भारतासाठी हा लाजिरवाणी गोष्ट आहे असा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. भारताची अवस्था डरपोक उंदरासारखी झाली आहे. आपले पंतप्रधान फक्त टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तुम्ही शत्रूला कमी लेखत आहात असं सांगताना त्यांनी एस जयशंकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही केली. 

Add Zee News as a Preferred Source

'ट्रम्पसारख्या झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला'

"संपूर्ण जगाचा विध्वंस होईल अशाप्रकारे युद्ध सुरु होतं. हजारो लोक मारले गेले. आखाती देशांमधील अनेक ठिकाणी शेकडो लोक मारले गेले. पण इराणसारखा देश इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तीला शरण गेला नाही. 35 दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांना झुंजवत ठेवं. जगाच्या मनात अमेरिका-इस्रायल यांच्याबद्दल जी फालतू भीती होती ती त्यांनी मोडून काढली. देशासाठी कसं लढावं, राज्यकर्त्यांनी-जनतेने कसं बलिदान करावं हे इराणने दाखवून दिलं. तरीही इराणचं नुकसान झालं. इस्रायलचं त्याहून जास्त नुकसान झालं. ट्रम्पसारख्या झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला," असं संजय राऊत म्हणाले. 

हे श्रेय आमच्या महाविश्वगुरुंना का मिळालं नाही? 

पुढे त्यांनी म्हटलं की, "शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचं श्रेय अमेरिकेला जातं. चीन तर मोठा देश आहे, पण पाकिस्तानलाही जात आहे. पाकिस्तान यानिमित्ताने पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला आहे. हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला हवं होतं. ते भारताला, महाविश्वगुरुला मिळायला हवं होतं. ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलच्या नेत्यानाहू यांना एका टेबलावर आणलं आणि जगाला शांततेचा संदेश दिला हे श्रेय आमच्या महाविश्वगुरुंना का मिळालं नाही? याचं कारण त्यांना कोणती भूमिकाच नाही". 

मुंबई हायकोर्टात रंगला माहीम मतदारसंघाचा वाद! शिंदेंचा नेता ठाकरेंच्या आमदाराला नडला, या 'शिवसेने'च्या बाजूने लागला निकाल, नेमकं काय घडलं?

 

'महाविश्वगुरु राजकीय विरोधकांवर बॉम्ब टाकत होते'

"जगात युद्ध सुरु आहे आणि महाविश्वगुरु केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे राजकीय विरोधकांवर बॉम्ब टाकत होते. तेदेखील शब्दबॉम्ब आहेत. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, उपराष्ट्रपती ही त्यांची हत्यारं असून यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याच काम महाविश्वगुरु करत होते. तिकडे जागतिक युद्ध थांबण्याचं श्रेय चीन आणि पाकिस्तानने घेतलं," असा टोला त्यांनी लगावला, 

'पाकिस्तानला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे त्यासाठी नरेद्र मोदी जबाबदार'

"शांतता बैठक इस्लामाबादला होणार आहे. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होतात, जिथे भाजपाचा झेंडा फडकावणार होता तिथे तिथे ट्रम्प, नेत्यानाहू, इराणचे राज्यकर्ते बसून जागतिक शांततेवर चर्चा करत आहेत. भारतासाठी, पंतप्रधान मोदींसाठी आणि त्यांच्या सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पाकिस्तानला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे त्यासाठी नरेद्र मोदी आणि त्यांचे सरकार जबाबदार आहेत," असंही ते म्हणाले आहेत. 

'मोदींना, सरकारला मारलेली ही चपराक'

"वॉर रुकवा दी म्हणत होते, पण युक्रेन-रशिया युद्ध सुरुच आहे. ट्रम्प जर चीन, पाकिस्तानचे आभार मानत असतील तर मोदींना, सरकारला मारलेली ही चपराक आहे. मोदींना आता तर सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही. भारताची अवस्था मोदींमुळे डरपोक उंदरासारखी झाली आहे. आशियात खंडात इतक्या घडामोडी घडतअसताना पंतप्रधान टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत आहेत. सौदी अरेबिया, जॉर्डन, नेपाळ, दुबई, इराण यांच्याशी फोनवरुन बोलत असतात. पण युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तानला मिळालं," अशा शब्दांत त्यांनी सुनावलं. 

'एस जयशंकर यांनी राजीनामा दिला पाहिजे'

एस जयशंकर यांनी पाकिस्तानला दलाल राष्ट्र म्हटलं होतं. पण ट्रम्प यांनी त्याच पाकिस्तानला युद्ध थांबवण्याचं श्रेय दिलं. सर्वात आधी एस जयशंकर यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही शत्रूला कमी लेखत आहात. एस जयशंकर यांच्यासाख्या माकडांना मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे. त्यांच्यामुळे नाचक्की झाली आहे असं टीकास्त्र त्यांनी सोडलं. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More