'एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते', संजय राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले 'पृथ्वीराज चव्हाणांना...'

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काँग्रेसमध्ये (Congress) जाणार होते असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.  एकनाथ शिंदेंबाबत पृथ्वीराज चव्हाणांना (Prithviraj Chavan) विचारा असंही ते म्हणाले.   

शिवराज यादव | Updated: Mar 15, 2025, 02:21 PM IST
'एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते', संजय राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले 'पृथ्वीराज चव्हाणांना...'

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काँग्रेसमध्ये (Congress) जाणार होते असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.  एकनाथ शिंदेंबाबत पृथ्वीराज चव्हाणांना (Prithviraj Chavan) विचारा असंही ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंचा भगव्याशी संबंध नाही. एकनाथ शिंदेंच्या हातात भगवा नाही भाजपचा झेंड आहे असंही विधान त्यांनी केलं आहे. 

"एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडीमात्र संबंध नाही. भाजपाच्या ताटाखालचे मांजर झालेले ते लोक आहेत. त्यांच्या हातात भगवा नाही. ते सगळे भाजपाचे झेंडे आहेत. अजित पवारांच्या हातात भाजपाचा झेंडा आहे, एकनाथ शिंदे यांच्या हातात भाजपाचा झेंडा आहे, त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करु नये," असं संजय राऊत म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते या विधानाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाण यांना एकदा विचारा, त्यांची मुलाखत घ्या. आज अहमद पटेल नाही आहेत, त्यामुळे फार चर्चा करायची नाही. व्यक्ती साक्ष देण्यास उपलब्ध नाही अन्यथा अहमद पटेल यांची दिल्लीत पहाटे दिल्लीत कोणाशी चर्चा झाल्या होत्या हे सर्वात जास्त मला माहिती आहे".

नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया

"संजय राऊत यांची होळीची कालची भांग उतरली नाही असं मी म्हणणार नाही. कारण रोजच नशा करून ते वक्तव्य करत असतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे नकार दिलेला आहे. तुम्हाला माहित होतं एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं? नगर विकास मंत्री का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का उद्धव ठाकरे घाबरत होते. त्यांच्यावरती जबाबदारी टाकून अख्या महाराष्ट्र मध्ये निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही का करत होतात? लोकांमध्ये एकनाथ शिंदे लोकप्रिय आहेत हे तुम्ही मान्य केलं आहे. ज्या झाडाला फळ लागतात त्याच झाडावर लोक दगड मारतात. एकनाथ शिंदे मोठा वटवृक्ष आहे," असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत. 

"जी झाडं फळं, फुलं देऊ शकतो त्याच झाडाखाली लोक येऊन थांबतात. तुम्ही निवडुंगाचे झाड आहात. ना तुम्ही फलं, फुळं देता ना तुमच्यापासून सावली मिळते. ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणाचा नगरसेवक देखील तुम्ही निवडून आणू शकणार नाही. एकनाथ शिंदेंवरचा राग तिरस्कार तुमचा पूर्वीपासूनचा होता. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा वक्तव्य करत आहात," असंही त्यांनी सांगितलं.