'एक सिने कुटुंब मुलाचं नाव तैमूर ठेवतं अन् मोदी...,' संजय राऊतांचं रोखठोक; 'मूर्खांनी औरंगजेबाला...'

Sanjay Raut on Taimur: तैमूरच्या नावानं एक फिल्मस्टार मुलाचं नाव ठेवतो आणि पंतप्रधान मोदी त्याचं कौतुक करतात. या हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 23, 2025, 11:31 AM IST
'एक सिने कुटुंब मुलाचं नाव तैमूर ठेवतं अन् मोदी...,' संजय राऊतांचं रोखठोक; 'मूर्खांनी औरंगजेबाला...'

Sanjay Raut on Taimur: औरंगजेब चारशे वर्षांपासून थडग्यात विसावला आहे. त्या थडग्यावरून महाराष्ट्रात दंगल पेटवण्यात आली. नागपूरची निवड त्या दंगलीसाठी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची निवड कोणी केली काय? अशी शंका संजय राऊत यांनी सामनामधील 'रोखठोक'मधून व्यक्त केली आहे. तैमूरच्या नावानं एक फिल्मस्टार मुलाचं नाव ठेवतो आणि पंतप्रधान मोदी त्याचं कौतुक करतात. या हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो असा टोलाही त्यांनी लगावला आहे. नवहिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाला भाजपमधील बाटगे खतपाणी घालत आहेत. हा धोका महाराष्ट्राला आहे असंही ते म्हणाले आहेत. 

"चारशे वर्षांपूर्वी कबरीत गेलेल्या आलमगीर औरंगजेबावरून महाराष्ट्रात दंगल उसळली. दंगलीचा केंद्रबिंदू नागपूर आहे हे विशेष. राज्यकर्तेच दंगली घडवतात हे खरे, पण त्या राज्यकर्त्याला आपल्या मतदारसंघात, आसपास दंगल नको असते. त्यामुळे नागपूरच्या दंगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका आहे हे मानायला मी तयार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात हे सर्व घडले. त्यामुळे फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी नागपूरची युद्धभूमी केली काय?," अशी शंका संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. 

उद्धव ठाकरेंनी खरंच नारायण राणेंना फोन केला? संजय राऊतांनी सांगून टाकलं, म्हणाले 'त्यांच्या कुटुंबातून...'

 

"नागपूरच्या दंगलीने गृहखात्याचा डोलारा पोकळ पायावर उभा आहे हे दिसले व बीड, परभणीपासून नागपूरपर्यंत याचे प्रत्यंतर रोजच येत आहे. गुजरातच्या दाहोदमध्ये 3 नोव्हेंबर 1618 ला औरंगजेबाचा जन्म झाला. तो दिल्लीत गेला व दिल्लीतून महाराष्ट्र काबीज करायला निघाला आणि महाराष्ट्रातच कबरीत गेला. औरंगजेबाच्या अनेक बेगमा होत्या, पण हिराबाईवर त्याचे प्रेम होते. तीसुद्धा गुजरातचीच होती. आता दिल्लीत गुजराती राज्यकर्त्यांचीच सत्ता आहे व त्याच राज्यकर्त्यांच्या समर्थकांना महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर उखडायची आहे. याच समर्थकांनी गांधी हत्यारा गोडसेचा गौरव केला व त्यांना हिटलरही प्रिय आहे. महाराष्ट्रात हे असे विष पसरवून नवहिंदुत्ववाद्यांना देशात अराजक माजवायचे आहे," असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

"औरंगजेब कोणत्याही धर्मात असला तरी तो कोणत्याही सभ्य समाजाचा आदर्श ठरू शकत नाही. मोगल शासक भारतात तलवार घेऊन आले ते येथील संपत्ती लुटण्यासाठी. त्यामागे धार्मिक प्रेरणा नक्कीच होती. 1399 साली भारतावर हल्ला करण्यासाठी तैमूर लंगडा घुसला. त्याने हजारो निरपराधांची कत्तल केली. ‘तुजुक-ए-तैमुरी’मध्ये तैमूर सांगतो, “हिंदुस्थानात घुसण्याचा माझा हेतू साफ आहे. मी येथे पर्यटनासाठी आलो नाही. काफिरांना मारणे, दुसरे काफिरांची दौलत लुटणे. कारण ती मुसलमानांसाठी आईच्या दुधाइतकीच प्रिय आहे.” हे असे असताना देशातील एक प्रख्यात सिने कुटुंब आपल्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवते व आपले पंतप्रधान त्या तैमूरचे कौतुक करतात. ते सर्व औरंगजेब कबर खात्याचे लोक सहन करतात," असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

औरंगजेबाने त्याचा बाप, भाऊ यांना तुरुंगात डांबले किंवा खतम केले. लालकृष्ण आडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना ‘कैद’ झालेल्या शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही असंही ते उपहासात्मकपणे म्हणाले. 1990 सालात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या शहरात आले. त्यांनी औरंगजेबाची कबर खोदा असे सांगितले नाही, तर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करून औरंगजेबाचे अस्तित्वच येथे संपवले याची आठवण त्यांनी करुन दिली. 

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "औरंगजेबाला कोणतेच व्यसन नव्हते. कोणासही गैर बढती त्याने कधी दिली नाही असे यदुनाथ सरकार यांनी म्हटले आहे. ‘आलमगीर जिंदा पीर’ असेच त्याला लोक संबोधित. स्वतः काहीतरी उद्योग केला पाहिजे म्हणून हातांनी तो कापडाच्या टोप्या बनवी. आपल्या मृत्यूनंतर या टोप्यांतून कुराणाच्या प्रती लिहून मिळविलेले पैसे फकिरांना वाटण्यात यावेत असे त्याने लिहून ठेवले होते. त्याच्याबरोबर स्वारीत दौडत येणारी त्याची बेगम रबिया उल दौरानी हिचे स्मारक उभारण्यासाठी ताजमहालाची प्रतिकृती उभारण्याचा त्याने प्रयत्न केला. ‘बीबी का मकबरा’ या नावाने ही सुंदर इमारत आज छत्रपती संभाजीनगरात कुठूनही प्रवेश केला तरी नजरेत येते. दख्खनचा ताजमहाल म्हणून ही इमारत प्रसिद्ध आहे. आता ज्यांना औरंगजेबाचे थडगे पाडायचे आहे, त्यांना हा ताजमहालही उखडायचा आहे काय? औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण होते हे योग्य नाही. औरंगजेबाचे थडगे हे मराठा शौर्याचा विजयस्तंभ आहे. तो स्तंभ पाडू पाहणारे इतिहासाचे शत्रू आहेत. थडग्यातला औरंगजेब महाराष्ट्रातल्या मूर्खांनी जिवंत केला. तो त्यांच्याच मानगुटीवर बसला".