Sanjay Raut on Raj Thackeray: शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून काही गौप्यस्फोट केले आहेत. या पुस्तकात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही उल्लेख केला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंबद्दल आपल्या मनातील एक सल बोलून दाखवली आहे. तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं ते म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या या विधानावर आता राज ठाकरे काय बोलतात हे पाहावं लागणार आहे.
- राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी मैत्रीचे संबंध राहिले होते. परंतु त्यांनी बाळासाहेबांची साथ सोडून मनसेची स्थापना केल्यावर अनेकांसोबतचे मैत्रीचे संबंध दुरावले. राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबाबतीतही तेच घडले. एकाच पक्षात असताना मैत्री होती,परंतु नंतर राजकारणात दोघांनीही एकमेकांवर टिकेचे प्रहार केले. तरीही त्यांच्यातील जिव्हाळा कायम होता. त्यामुळंच संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून ती सल बोलून दाखवली आहे.
"माझ्यावर आणि कुटुंबीयावर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टेत म्हणाले होते, 'संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी!' खरं तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नात कायम राहिलं आहे. आम्ही अनेक वर्ष जवळून काम केले. सुख-दुःख वाटलं. उलट या वेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती. मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा तरी ते फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही," असं संजय राऊत म्हणला आहेत.
तुरूंगात जाण्याइतके माझ्यात बळ नाही. मला अटॅक येवून मी मरेन किंवा मला आत्महत्या तरी करावी लागेल असं हतबल होऊन रविंद्र वायकर बोलल्याचं संजय राऊतांनी आपल्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकात म्हटलं आहे. शिंदे गटाने दबाव टाकल्याने आणि भीतीने वायकर यांनी शिवसेना सोडल्याचा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केला आगे.
"वायकर शिंदे गटात गेले त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावरील हा दबाव होता. वायकर शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक होते," असं त्यांनी पुस्तकात म्हटलं आहे.
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचानक वायकर यांना टार्गेट करायला सुरुवात केली. रवींद्र वायकर यांना ईडी अटक करणार, असा धुरळा किरीट सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबाची गाळण उडाली आणि त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडल्याचे पुस्तकात म्हटलं गेलं. या पुस्तकात ईडीचा गैरवापर करून वायकर यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले गेल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.