Exclusive : राऊतांना नेमका कोणता आजार झालाय? स्वत:च पहिल्यांदा उल्लेख करत म्हणाले, 'उपचार अधिक...'

Sanjay Raut On his health : तो काळ, त्या आठवणी... प्रकृती अस्वास्थ्याशी झगडणाऱ्या राऊतांनी का म्हटलं, कायम कृतज्ञ रहावं... या कणखर नेत्याची ही बाजू फार क्वचित समोर येते. त्यापैकीचाच हा प्रसंग...   

सायली पाटील | Updated: Jan 14, 2026, 07:40 AM IST
Exclusive : राऊतांना नेमका कोणता आजार झालाय? स्वत:च पहिल्यांदा उल्लेख करत म्हणाले, 'उपचार अधिक...'
Shivsena ubt mp sanjay raut on his cancer battle and how reading helped to heal him latest news jahir sabha exclusive

Sanjay Raut On his Cancer Battle : शिवसेना उबाठा (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी नुकतीच झी 24तासच्या निवडणूक विशेष, 'जाहीर सभा' कार्यक्रमाला हजेरी लावत अनेक मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजीसुद्धा केली आणि तितक्याच महत्त्वाच्या आणि गंभीर मुद्द्यांवरसुद्धा त्यांनी भाष्य केलं. यादरम्यान राऊतांनी मधल्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळं माध्यमांपासून ते राजकीय वर्तुळापासूनही राऊत दूर होते. मात्र, मुंबईच्या आणि एकंदरच या मनपा निवडणुकांच्या धामधुमीत आमच्यासारख्यांना शांत बसणं अशक्य म्हणत 'आधी पक्ष आणि नंतर प्रकृती' याच सूत्रावर आपण काम करत असल्याचं राऊत म्हणाले. 

Add Zee News as a Preferred Source

'राकारणात दीर्घद्वेषी नसावं', असं सुंदर वाक्य त्यांनी या प्रश्नोत्तरांच्या सत्रात बोलत सर्वांचीच मनं जिंकली. अशा या खासदार संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव दरम्यानचा एक मोठा काळ मोकळा मिळाला, त्यादरम्यान तुम्ही नेमकं काय केलं? आजारपणाच्या काळात तुम्हाला तारून नेणाऱ्या कोणत्या गोष्टी होत्या? असा प्रश्न विचारला असता राऊतांनी प्रथमच जाहीरपणे आपल्या कर्करोगाविषयीच्या लढ्यावर मोजक्या शब्दांत भाष्य केलं. 

'वेदनांचं वर्णन मी करु शकत नाही...'

'मी या मोकळ्या वेळात वाचत राहिलो. वाचन करणंही शक्य होत नसताना मी वाचन करत राहिलो. एखाद्याला कॅन्सरसारखा आजार होतो आणि ते उपचार तर आजारापेक्षाही भयंकर असतात, अतिशय भयंकर असतात. त्या ज्या वेदना असतात त्यांचं आता मी फार वर्णन करत नाही. पण, त्यातूनही आपल्याला वेळ घालवायचा असेल तर, आपण वाचलं पाहिजे, लिहिलं राहिलं पाहिजे. माझ्या संपूर्ण हातावर तेव्हा इंजेक्शन होते. मात्र तरीही लिखाणामध्ये माझा वेळ जायचा. त्याही काळात मी अग्रलेख रोज लिहित होतो इस्पितळातून, इतरही लिखाण करत होते. ते होत असतं... मधल्या काळात हृदयाचं काही झालेलं, पण मी लिहीत होतो, काम करत होतो. आपण आपला धर्म सोडायचा नाही. शेवटपर्यंत लिहित राहायचं, मी पत्रकार आहे, मी संपादक आहे... शेवटच्या क्षणापर्यंत मी लिहिणार, वाचणार, बोलणार...', असं म्हणत कामाप्रती, पक्षाप्रतीची समर्पकता, आपलं लिखाण आणि वाचनानं या दुर्धर आजाराशी सामना करताना एक प्रकारे मोठी मदत केली असं सांगत राऊतांनी आपल्या जीवनातील आव्हानात्मक काळावर भाष्य केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

आजारपणाविषयीची सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर अनेक विरोधकांनीही राऊतांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या, याबाबत कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी त्या सर्व राजकीय नेतेमंडळींचे आभार मानले. अगदी पंतप्रधान मोदींपासून फडणवीसांपर्यंत कोणी फोनवरून संपर्क साधत, कोणी मेसेज करत आपली विचारपूर केल्याचं सांगत राजकीय मतभेद असले तरीही व्यक्ती म्हणून कायमच सहानुभूती असते आणि राजकीय द्वेष हा दीर्घकालीन नसावा असं सांगत माणसानं कायमच कृतज्ञ असावं असं राऊत ओघाओघात सांगत नकळतपणे त्यांची एक हळवी बाजू सर्वांसमोर ठेवून गेले. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More