'....होय आम्ही गुंड आहोत,' उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना ललकारलं; 'तुमच्या दोन मालकांचे बूट चाटून...'

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाही, आणि गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करुच अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 5, 2025, 03:01 PM IST
'....होय आम्ही गुंड आहोत,' उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना ललकारलं; 'तुमच्या दोन मालकांचे बूट चाटून...'

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. जर महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि तुम्ही  गुंड म्हणत असला तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाही, आणि गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करुच असं जाहीर आव्हानच उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्यात दिलं आहे. महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्यानंतर काहीजण कोर्टात गेले ती गुंडगिरी होत नाही का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. तो केडिया यांचीच पिल्लावळ आहे असाही टोला त्यांनी लगावला आहे. 

"देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने मला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी सखा पाटील यांनी केलेल्या विधानाची आठवण करुन देत आहे. जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे येथील राज्यकर्ते त्यांना मी बाटगे म्हणतोय. मुंबई मराठी माणसाने मिळवली आहे. तेव्हा काँग्रेस सत्तेत होती. मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हते. तुम्ही नुसते नावाने मराठी आहात. तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही हे तपासावं लागेल," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. 

Uddhav Thackeray Speech: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी; उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर केलं जाहीर

 

पुढे ते म्हणाले, "कशासाठी हा घोळ घातला जात आहे? देश एक, संविधान एक आणि निशाणही एकच असलं पाहिजे. तो तिरंगा हवा, भाजपाचं भांडी पुसायचं फडकं नको अशी टीका त्यांनी केली. एक देश, एक निवडणूकच्या माध्मयातून हिंदी, हिंदू, हिंदुस्तान याचा प्रयत्न आहे. हिंदू, हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती मान्य नाही. तुम्ही कितीही कमिट्या केल्या, हिंदीची सक्ती 7 पिढ्या उतरत्या तरी लागू देणार नाही". 

उद्धव ठाकरेच्या काळातील असं ओरडत आहे. इतकं काम करत असताना गद्दारी करुन मला का पाडलं? अशी विचारणा त्यांनी केली. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली याचा अभिमान आहे असंही ते म्हणाले. 

निवडणुकीपर्यंत एकत्र राहणार का? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, 'मी आणि राज महापालिका...'

 

"मराठीचे दुश्मन कोण आहेत? महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्यानंतर काहीजण कोर्टात गेले ती गुंडगिरी होत नाही का? तो केडिया यांचीच पिल्लावळ आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा. शिवसेनेने आजपर्यंत काय केलं अशी विचारणा करत आहेत. आता राज मी तुला माझ्यासोबत घेतो. आपण तेव्हा एकत्र होतो आणि आता पुढेही एकत्रच आलो आहोत. तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे लचके तोडले. महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवले, आर्थिक केंद्रं गेलं, हिरे व्यापार गेला, मोठी ऑफिस गेली. आम्ही सगळं करत होतो पण तुम्ही गद्दारी करुन सरकार पाडलं. तुमचे जे दोन व्यापारी मालक तिथे बसले आहेत त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे करत आहात," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. 

पुढे ते म्हणाले "आपल्या दोघांमध्ये भांडण लावून, नतद्रष्ट डोक्यावर बसत आहेत. हे किती काळ सहन करायचं आहे? प्रत्येक वेळी काही झालं की भांडणं लावायची. आताही तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? काहीजण म्हणतात यांचा म मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे. नुसता महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्र काबीज करु".
 
"आज तर निवडणुका नाहीत. सत्ता येते आणि जाते, पण आपली ताकद एकजुटीत असली पाहिजे असं बाळासाहेबांनी सांगितलं आहे. संकट आलं की आपण मराठी एकवटतो, आणि संकट गेलं की आपणच एकमेकांत भांडू लागतो. आता हा नतद्रष्टपणा अजिबात करायचा नाही. गेल्या विधानसभेत त्यांनी बटेंगे तो कटेंगे केलं. हिंदू मुसलमान तर केलंच, पण खासकरुन मराठींमध्ये केलं. यांची निती अशीच आहे. गुजरातमध्ये पटेलांना एकत्र केलं. हरियाणात जाट एकत्र केले आणि महाराष्ट्रात मराठ्यांना उचकवलं आणि मराठेतर एकत्र केला. त्यांच्यात भिती निर्माण केली. मराठी माणूस मराठी माणसाशी भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावर राज्य करु लागले आणि आपण त्यांच्या पालख्या वाहायच्या. पालख्यांचे भोई होणार की कधीतरी माय मराठीला पालखीत सन्मानाने बसवणार आहात?", अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.