गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारची सत्यता बघण्यासाठी आणि खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी अंजली दमानिया कांदिवली येथील समतानगरमध्ये पोहोचल्या होत्या.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कांदिवलीतील सावली बारवरुन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप केले असतानाच, सत्यता बघण्यासाठी आणि खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कांदिवली येथे पोहोचल्या होत्या. यादरम्यान त्यांनी बारवर धाड टाकली असता 22 महिला सापडल्या होता असा खुलासा केला. यावेळी त्यांनी आम्हाला असे गृहराज्यमंत्री नको सांगत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
"महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांचा डान्स बार असला आणि तोसुद्धा परवाना त्यांच्या आईच्या नावे असेल तर त्याची सगळी माहिती घेण्यासाठी आले आहे. मी कधीही कोणतंही प्रकरण घेतलं की आधी कागदपत्रं घेते. मी आधी जागा पाहून, समतानगर पोलीस ठाण्यात जाणार आहे. मी पोलिसांची वेळ घेतली असून, आज जाऊन परवान्याची कॉपी, व्हिडीओ घेणार आहे. जी माहिती आणि एफआयआर आहे त्यात स्पष्ट गोष्टी लिहिल्या आहेत. पोलिसांचं पाच जणांचं पथक पाठवण्यात आलं होतं. एकजण वरुन व्हिडीओ काढत होता. इशारा केल्यानंतर 11 वाजून 10 मिनिटांनी धाड टाकण्यात आली होती. 22 महिला सापडल्या होत्या," अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
पुढे त्यांनी सांगितलं की, "सर्व अटी-शर्थींचं उल्लंघन करण्यात आलं होतं. स्टेजच्या खाली महिला ग्राहकांसह बसलेल्या होत्या. हे सर्व एफआयआरमध्ये वाचलं आहे. योगेश कदम यांच्या आईच्या नावे परवाना आहे. आधी त्यांनी ऑर्केस्टा असल्याचं सांगितलं होतं. हा ऑर्केस्ट्रा नाही. व्हिडीओसहित सर्व माहिती पोलिसांकडे आहे".
"माझं नाव होतं, पण चालवायला दिलं होतं असा त्यांचा दावा आहे. पण तसं नसून, परवाना आईच्या नावे आहे. याशिवाय नोकरदार माणसं होती. याचा अर्थ हा बार योगेश कदम यांचा आणि त्यांच्या वडिलांचा होता. बारच्या परवान्यावर आईचं नाव होतं. असे गृहराज्यमंत्री महाराष्ट्राला नको. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. मला कायदेशीरपणे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी समतानगर पोलीस ठाण्यात जाणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
"एफआयआर, परवाना कॉपी मिळणार आहे. फोटो दिले तर तेदेखील घेणार आहे. कायदेशीर कारवाई कराची असल्यास या गोष्टी लागणार आहे. पोलिसांशी बोलले तेव्हा आम्हाला देण्यास काहीच समस्या नसल्याचं त्यांनी सांगितलं. एफआयआर प्रत देण्यास पोलीस नकार देऊ शकत नाहीत," असंही त्यांनी म्हटलं.
पुढे त्यांनी सांगितलं की, "अनिल परबांनी त्यांचा लढा द्यावा. मी राजकीय लोकांशी बोलत नाही, माझ्या राज्याचे गृहमंत्री डान्स बार चालवत असतील तर हे दुर्दैवी आहे. बीडमधील डान्स बारसंबंधी मी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा मला माहिती नव्हतं. त्यांनी काही कारवाई केली नव्हती, मुख्यमंत्र्यांकडे व्हिडीओ पाठवल्यावर तात्काळ कारवाई झाली. पण आज लक्षात येतंय की स्वत:चा डान्स बार असताना दुसऱ्यावर कारवाई कशी करणार?".
"ऑर्केस्ट्राचे काही नियम असतात. स्टेजवर असणारे खाली येऊ शकत नाहीत. त्याच्यात नृत्य करता येत नाही. त्याच्याच पाचच्या वर कलाकार असू शकत नाहीत. पण इथे 22 बायका होत्या. नृत्य करत होत्या, लोकांच्या बरोबर होत्या हे एफआयरमध्ये आहे. याचा अर्थ कोणताही नियम लागू होत नव्हता. नियम कायदे फक्त सामान्य जनतेसाठी असतात. जबाबदार मंत्र्यांकडून परवाना आईच्या नावे असताना तो बदलून घेणं गरजेत होतं. तसं त्यांनी केलं नाही. काही चुकीचं केलं नव्हंत तर बोर्ड झाकण्याची वेळ का आली?," अशी विचारणाही त्यांनी केली.