)
Solapur News : पैसाअडका, दागदागिना, संपत्ती... हा हव्यास काही केल्या माणसाची पाठ सोडत नाही. मात्र हाच हव्यास आयुष्यात एकदातरी मोठी अद्दल घडवतो आणि हा धडा कधीच विसरता येणार नाही असा असतो. सोलापुरात अशीच एक धक्कादायक घटना घडली असून, गुप्तधनाचा हंडा देतो सांगत एका भोंदूबाबानं अनेकांचीच फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असं सांगत भोंदू बाबानं 1 कोटी 87 लाखांची फसवणूक केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मोहम्मद कादर शेख असं या फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचं नाव असून, त्यानं सोलापुरात अनेकांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे. फसवणूक करणाऱ्या मोहम्मद कादर शेख याला कर्नाटकातील विजापूरमधून पोलिसांनी अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्यासह पोलीस पथकानं ही कारवाई केली.
मोहम्मद कादर शेख याने सोलापुरातील गोविंद वंजारी यांना जमिनीतून गुप्तधन काढून देतो असं सांगत त्यांना आमिष दाखवलं आणि फसवणूक केली. 'तुमच्या जमिनीत गुप्तधन लपवलं आहे, ते मी काढून देतो' असं सांगत त्यांचा विश्वास जिंकला आणि कावेबाजपणानं त्यानं वंजारी यांच्याकडून मोठी रक्कमही घेतली. काही दिवस उलटल्यानंतर वंजारींना शेखवर संशय आला, त्यानं आपली फसवणूक केल्याची कुणकूण त्यांना लागली.
आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराचं गांभीर्य ओळखून त्यांनी तकड पोलीस स्थानक कठलं. ज्यानंतर याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोलापूर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने सापळा रचून भोंदू बाबाला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. या कारवाईमध्ये पोलीस पथकाला त्याच्या विजापुरातील आदिलशाहीनगरच्या घरातून जादूटोण्याचं साहित्यही सापडलं. दरम्यान शेख याला 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यानंतर त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सोलापूरात घडलेल्या फसवणूक प्रकरणाचा मुख्य मुद्दा काय?
सोलापूरात एका भोंदू बाबाने 'जमिनीतून गुप्तधन काढून देतो' असा दावा करून अनेकांची फसवणूक केली. या प्रकरणात 1 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक झाली असून, पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक केली आहे.
फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि पार्श्वभूमी काय?
फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचं नाव मोहम्मद कादर शेख आहे. त्याने सोलापूरात अनेकांना जमिनीतील गुप्तधन काढण्याचं आमिष दाखवून विश्वास जिंकला आणि मोठी रक्कम घेतली.
मुख्य पीडित कोण आणि फसवणूक कशी झाली?
मुख्य पीडित गोविंद वंजारी आहेत. शेखने त्यांना 'तुमच्या जमिनीत गुप्तधन लपवलं आहे, ते मी काढून देतो' असं सांगून विश्वासघात केला आणि कावेबाजपणे रक्कम घेतली. काही दिवसांत संशय आल्यावर वंजारी यांनी तकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.