Kalyan Crime News: पती आणि पत्नीतील वाद आणि त्यातून घडणाऱ्या घटना या काही नवीन नाहीत. कल्याणमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर पत्नी माहेरी निघून गेली याचाच राग पतीच्या मनात होता. या रागातूनच आरोपीने पत्नीच्या आईसोबत भयंकर कृत्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर बायको माहेरी निघून आली. पतीने तिला परत आणण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र तिच्या आईने तिला परत पाठवण्यास नकार दिला. याचाच राग मनात ठेवून जावयाने बनाव रचत सासूचे अपहरण केले. जावयाने सासूचे अपहरण करत तिला तळोजा येथे घेऊन गेला आणि एका घरात बंद करुन तिला मारहाण केली, असा आरोप करण्यात येत आहे. मानपाडा पोलिसांनी सासूला जावयाच्या तावडीतून सुटका केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. 


भावेश माधवी तळोजा येथील एका गावात राहतात. त्याचं लग्न कल्याण येथे राहणारी दीक्षिता खोकरे यांच्यासोबत झालं होतं. त्यांचा एक मुलगादेखील आहे. दिक्षिता आणि भावेश यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. रोजच्या भांडणांना कंटाळून दीक्षिता मुलाला घेऊन माहेरी निघून आली. भावेश आणि त्याचा मित्र सूरज म्हात्रे दीक्षिताला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी गेले होते. 


मात्र, दीक्षिताच्या आईने तिला पुन्हा सासरी पाठवण्यास नकार दिला. त्यावर संतापलेल्या भावेशने त्याच्या सासूला चाकुचा धाक दाखवत धमकी दिली त्यानंतर जबरदस्ती तिला गाडीत बसवून तळोजाच्या त्याच्या घरी घेऊन गेला. त्याने सासूला लोखंडाच्या रॉडने आणि कात्रीने मारहाण केली. दीक्षिता तिच्या आईला शोधत असताना भावेशना तिला फोन करुन तुझी आई माझ्या ताब्यात आहे. माझ्या मुलाला घेऊन ये आणि तुझी आई घेऊन जा, अशी धमकी दिली. 


भावेशच्या फोननंतर दीक्षिताने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मानपाडा पोलिसांसह कुटुंबीय तळोजा येथे पोहोचले. तेथे दीपाली जखमी अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी भावेशच्या ताब्यातून सासू दीपालीची सुटका केली. तसेच पोलिसांनी तात्काळ भावेश आणि सूरजला अटक केली. दोन्ही आरोपींविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी तपास करत आहेत.