SSC HSC Result: राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अद्याप बाकी आहेत. दरम्यान दहावी, बारावी परीक्षानंतर विद्यार्थी, पालक सुट्ट्यांचे नियोजन करु लागलेयत. दरम्यान परीक्षांनंतर आता मुलांचे निकाल कधी लागणार? याचे पालकांना वेध लागले आहेत. दरम्यान दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू झाली आहे.दरम्यान दहावी, बारावी निकालासाठी विद्यार्थी, पालकांना जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. कारण दहावी, बारावी परीक्षांचे निकाल 15 मेपूर्वीच जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाचा पेपर राहिला असून दहावीच्या विद्यार्थ्यांचेही 2 पेपर बाकी आहेत. 17 मार्च रोजी परीक्षा संपणार आहे. दरम्यान विरारमध्ये शिक्षीकेने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या. मात्र, घरात लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण उत्तर पत्रिकेचा गठ्ठा जळाला. यानंतर बोर्डाकडून नियम कठोर करण्यात आले आहेत. ज्या विषयांचे पेपर झाले आहेत, त्याच्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत व्हावी, यासाठी दररोज शाळेच्या वेळेत उत्तरपत्रिका तपासण्याचे आवाहन करण्यात आलंय. विषय शिक्षकाने किमान 35 उत्तरपत्रिका तपासाव्यात, असे निर्देश बोर्डाकडून देण्यात आले आहेत. दुसरीकडे उत्तरपत्रिका तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल 15 मेपूर्वीच जाहीर होतील, अशी माहिती समोर येत आहे.
विरार मध्ये राहणाऱ्या एका शिक्षिकेने उत्तर पत्रिका तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या. कामानिमित्त शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचे घर बंद असतानाच शॉर्ट सर्किट झाल्याने घरामध्ये मोठी आग लागली, ज्यामध्ये या पेपरसह घरातील इतर सामानही जळून खाक झाले आहे. घरात लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण उत्तर पत्रिकेचा गठ्ठा जळून खाक झाला आहे. यात १७५ विद्यार्थ्यांच्या कॉमर्समधील ओसी विषयाच्या या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. या विद्यार्थ्यांना अन्य विषयांमध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीवरून त्या विषयासाठी गुण दिले जाणार आहेत. उत्तरपत्रिका घरी नेल्याच्या तक्रारीनंतर चौकशीअंती संबंधित शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरपत्रिकांची तपासणी गतीने सुरू असून दोन्ही इयत्तांचे निकाल 15 मेपर्यंत जाहीर होतील, असे नियोजन असल्याची माहिती समोर येतेय.