सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे उर्वरित वेतन (44 टक्के) त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे. निधीअभावी एसटी महामंडळाकडून मार्च महिन्याचे 56 टक्के वेतन वितरीत केले होते. आता सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर उर्वरीत 44 टक्के वेतन आज वितरीत करण्यात आले आहे. राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेनंतर मंगळवापर्यंत उर्वरित वेतन येईल असं सांगितलं होतं. त्यानुसार आज सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे उर्वरित वेतन बँक खात्यावर जमा झालं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या महिन्यात 44 टक्के कपात करण्यात आली होती. दिवसरात्र एसटी प्रवाशांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला होता. एसटी महामंडळाला यंदा मागणीच्या तुलनेत अर्धा निधी देण्यात आला होता. एसटीतील 87 हजार कर्मचाऱ्यांना वेतन व एलआयसीसाठी महिन्याला 466 कोटी लागतात. पण राज्य सरकारने केवळ 305 कोटी 29 लाख रुपये दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनात 44 टक्के कपात करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री एकनात शिंदे सांगोला दौऱ्यावर असताना काही एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती. आमचं उर्वरित वेतन लवकर दिलं जावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागणीची दखल घेतली होती. त्यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर ओमप्रकाश गुप्ता यांनी मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन येईल असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचं उर्वरित वेतन प्राप्त झालं आहे.