महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, समोर आलं धक्कादायक कारण
ऐन दिवाळीत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही धक्कदायक घटना समोर आली आहे
जावेद मुलानी, झी मीडिया, दौंड : ऐन दिवाळीत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील देलवडी इथं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दिपाली कदम असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव असून त्या पोलीस नाईक पदावर सेवेत होत्या.
महिला पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी होऊन संबंधितावर कडक कारवाई होणार का? असा प्रश्न दीपालीच्या संतप्त नातेवाईकांनी केला आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाईड नोट
आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली यांनी आपला भाऊ रोहितला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली आहे. पोलीस नाईक कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं दिपाली यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वाल्मीक अहिरे यांच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन वर्षापूर्वी मयत दिपाली कदम यांची पोलीस खात्यामध्ये असणाऱ्या वाल्मीक अहिरे यांच्याशी ओळख झाली. अहिरे हा वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचं दिपाली यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
काहि दिवसांवर होतं लग्न
दिपाली यांचा 31 ऑक्टोबरला साखरपुडा झाला होता आणि येत्या 16 नोव्हेंबरला लग्नाचा मुहूर्त होता. लग्नासाठी दिपाली आपल्या मुळगावी देलवडी इथं आल्या होत्या. पण दिपाली लग्न करणार असल्याची माहिती मिळताच वाल्मीक अहिरेने नवरा मुलगा आणि दिपालीच्या भावाला फोन करुन धमकी दिली. दिपालीचं इतर कोणाशी लग्न करुन देऊ नका नाहीतर तुम्हाला मारुन टाकेन अशी धमकी त्याने दिली. या प्रकारामुळे निराश झालेल्या दिपालीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली
यासंदर्भात दिपालीचा भाऊ रोहित कदम यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस अधिक तपास करत आहेत.