ओ शेठ तुमची नक्कल केली थेट! सुनील तटकरेंनी मारली भरत गोगवलेंची स्टाईल

भरत गोगावले यांच्या याच स्टाईलची नक्कल खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. त्याला गोगावले यांनीही मिश्कील उत्तर दिलंय.

पुजा पवार | Updated: May 19, 2025, 08:24 PM IST
ओ शेठ तुमची नक्कल केली थेट! सुनील तटकरेंनी मारली भरत गोगवलेंची स्टाईल
(Photo Credit : Social Media)

मुंबई  : काखेत नॅपकिन ठेवणं ही भरत गोगावले यांची खास स्टाईल आहे. ते कायम असेच वावरताना दिसतात. मात्र भरत गोगावले यांच्या याच स्टाईलची नक्कल खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. त्याला गोगावले यांनीही मिश्कील उत्तर दिलंय.

सुनील तटकरे आणि भरत गोगावले, कोकणच्या राजकीय वर्तुळातील दोन मातब्बर नेते. एरव्ही एकमेकांना राजकीय कोपरखळ्या मारणारे हे नेते सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आलेत. त्याचं झालं असं की, काखेत नॅपकीन ठेवणं ही भरतशेठ यांची प्रसिद्ध स्टाईल आहे. सामान्यपणे लोक खांद्यावर नॅपकीन ठेवतात पण भरतशेठ यांचा स्वॅग वेगळाच आहे. म्हणून ते कायम खांद्यावर नाही तर काखेत नॅपकीन ठेवत असतात. भरतशेठ यांच्या याच स्टाईलची नक्कल खासदार सुनील तटकरेंनी केली. महाडच्या सभेत भाषण संपवताना तटकरे यांनी भरतशेठ गोगावले यांच्या नॅपकीन ठेवण्याच्या स्टाईलची नक्कल केली. त्यामुळे संपूर्ण सभेत एकच हशा पिकला.

आता तटकरेंनी मिमिक्री केल्यावर शांत बसतील ते भरतशेठ कसले. माझ्यासारखा मीच आहे म्हणत भरतशेठ यांनी तटकरेंना मिश्किल उत्तर दिलं. इतकंच नाही तर तुम्हाला नॅपकीन वापरायची असेल तर त्याचं ट्रेनिंग देऊ म्हणत भरतशेठ यांनी तटकरेंना टोला लगावलाय.

भरतशेठ आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. काखेत नॅपकीन ठेवणं असो किंवा एखाद्या विषयावर बिनधास्त मत व्यक्त करणं असो. राज्याच्या राजकारणात भरतशेठच्या अनोख्या आणि दिलखुलास स्वभावाची कायम चर्चा असते. सुनील तटकरेंनी त्यांची नक्कल करून हशा मिळवला. मात्र भरतशेठ यांनीही तितक्याच मिश्किलपणे तटकरेंना उत्तर दिलं.