वाल्मिक आणि धनंजय मुंडेंचा संवाद हत्येच्या अर्धा तासात झालाय, याचा अर्थ... : सुप्रिया सुळे

Supriya Sule Reacts On Dhananjay Munde Resign: सुप्रिया सुळे यांनी सुरेश धस आणि अंजली दमानिया यांचाही उल्लेख केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 4, 2025, 12:44 PM IST
वाल्मिक आणि धनंजय मुंडेंचा संवाद हत्येच्या अर्धा तासात झालाय, याचा अर्थ... : सुप्रिया सुळे
प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना केलं विधान (फाइल फोटो)

Supriya Sule Reacts On Dhananjay Munde Resign: मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा प्रकृतीच्या कारणावरुन दिल्याचं म्हटलं आहे. धनंजय मुंडेंनी ट्विटरवरुन, "मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे," असं म्हटलं असून यावरुन शरद पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधाभासाकडे लक्ष वेधत टीका केली आहे. तसेच संतोष देशमुखांच्या हत्येनंतरच्या एका घटनेचा उल्लेख त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

एकीकडे नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय अन् दुसरीकडे...

"धनंजय मुंडेंनी ट्विट केलंय. दुसरीकडे अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं. पण धनंजय मुंडेंच्या ट्विट मध्ये नैतिकतेमधील न चा ही उल्लेख केलेला नाही. हा किती मोठा विरोधाभास आहे. एकीकडे नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय अन् दुसरीकडे वैद्यकीय कारण मुंडेंनी दिलंय. यातून मोठा विरोधाभास दिसतो," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

84 दिवस याकडे​...

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या चार्टशीटमधील तपशीलावरुन सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. "जी चार्जशीट बाहेर आली आहे ते खूप भयानक आहे. त्यातील फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहिले असतील ना? मग राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला?" असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला. "सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी सिडीआर समोर आणलेले आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संवाद हत्येच्या अर्धा तासांमध्ये झालाय, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? 84 दिवस याकडे कानाडोळा केला. आता काय म्हणतात नैतिकतेवर राजीनामा दिला?" असा सवाल सुप्रिया यांनी उपस्थित केला. 

नक्की वाचा >> 'त्यांनी नैतिकतेवर...'; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची अवघ्या 5 शब्दांत प्रतिक्रिया

यासाठी मत दिले आहे का

"खंडणी हा गुन्हा देशात खूप मोठा गुन्हा आहे. मनमोहन सिंग सरकारनं पीएमएल घेतला आहे. समाज म्हणून राज्य म्हणून हे कारवाई होत नाही हे आपल दुर्दैवी आहे. एवढे मोठे सरकार आहे. एवढी संख्या आहे. खंडणी, कृषी घोटाळा, यासाठी मत दिले आहे का?" असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> 'मागील काही दिवसांपासून माझी...'; धनंजय मुंडेंनी सांगितलं मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचं खरं कारण

किती क्रूरपणे ही हत्या झाली असावी याचा अंदाज

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी केला संताप व्यक्त करताना, "वृत्तवाहिन्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे फोटो प्रसारीत केले आहेत. हे फोटो पाहताना कोणत्याही संवेदनशील माणसाचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही. हे फोटो पाहताना किती क्रूरपणे ही हत्या झाली असावी याचा अंदाज येतो. ही घटना आणि त्यातील क्रौर्य प्रचंड अस्वस्थ करणारे आणि माणूसकीला काळीमा फासणारे आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तसेच पुढे बोलताना, "याप्रकरणी ज्या शक्तींचा वारंवार उल्लेख होत आहे त्या शक्तींवर कारवाई झालीच पाहिजे," अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत केली आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More