Tanisha Bhise Case: पुणे पोलिसांचे प्रश्न आणि ससूननं अहवाल बदलला, आधी डॉ.घैसास यांना क्लिनचिट अन् नंतर...

Tanisha Bhise Case: पुण्यातील माता मृत्यू प्रकरण चौकशी अहवालात ‘ससून’ चा हलगर्जीपणा? असा सवाल उपस्थित होत आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 22, 2025, 11:57 AM IST
 Tanisha Bhise Case: पुणे पोलिसांचे प्रश्न आणि ससूननं अहवाल बदलला, आधी डॉ.घैसास यांना क्लिनचिट अन् नंतर...
Tanisha Bhise Death Case Sassoon Hospital Accused of Medical Negligence in Inquiry Report

Tanisha Bhise Case: पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत असताना आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील माता मृत्यू प्रकरण चौकशी अहवालात ‘ससून’ ने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ससूनच्या पहिल्या अहवालातून डॉ. सुश्रुत घैसास यांना क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र आता मंगेशकर रुग्णालयातील डॉ. घैसास यांच्यावर आता ठपका ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या पत्रानंतर मूळ मुद्द्यावर अभिप्राय देण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी अहवालावर चार मुद्द्यांवर अभिप्राय मागितल्यानंतर ससूनने सुधारित अहवाल दिला असल्याचे समोर आले आहे. तनिषा भिसे प्रकरणात दीनानाथ आणि डॉ. सुश्रृत घैसास यांना क्लीन चीट देणारे ससून रुग्णालय यांचा हा हलगर्जीपणा आहे की तो मुद्दाम केला गेला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. तर डॉक्टर सुश्रूत घैसास यांनी या प्रकरणात राजीनामा दिला होता.  ससून रुग्णालयाचा चौकशी अहवालातून रुग्णालय आणि  डॉक्टरला क्लीन चिट देण्यात आली होती. .ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीनं 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केलाय. यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट मिळालीय तर मंगेशकर रुग्णालयावरही ठपका ठेवलेला नाही. मात्र या अहवालावर पुणे पोलिसांनी काही मुद्दे उपस्थित केले. त्यानंतर ससूनकडून सुधारित अहवाल देण्यात आला. 

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांनी उपस्थित केलेले मुद्दे कुठले

1. हाय रिस्क स्थिती असूनही उपचारात दिरंगाई? 

2. रुग्णाची प्रकृती गंभीर असूनही, डॉ. घैसास यांनी तात्काळ उपचार न करता वेळ दवडल्याने परिस्थिती अधिक बिघडली का?

3. पाच तासांहून अधिक वेळ उपचाराशिवाय? 

4. रुग्णाला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्यावर पाच तासांपेक्षा अधिक वेळ ओपीडीच्या अ‍ॅसेसमेंट रूममध्ये ठेवण्यात आले, मात्र कोणतेही वैद्यकीय हस्तक्षेप न केल्याने रुग्णाने तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला का?

5. डिपॉझिट न मिळाल्याने उपचार न करण्याचा निर्णय घेतला का?

6. उपचारार्थी मुदतपूर्व प्रसूतीसाठी बाळांना ‘एनआयसीयू’मध्ये ठेवण्यासाठी १० लाख रुपये डिपॉझिटची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती. डिपॉझिट न मिळाल्याने उपचार न करण्याचा निर्णय घेतल्याचेही नमूद करण्यात आले आहे का?

ससूनचा सुधारित अहवाल

पुणे पोलिसांनी हे मुद्दे उपस्थित केल्यानंतर ससूनहे सुधारित अहवाल दिला आहे. ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉ. घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  डॉ घैसास यांच्यावर कलम १०६(१) नुसार अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. घैसास यांनी निष्काळजीपण आणि हलगर्जीपणा दाखवला त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉ सुश्रुत घैसास ईमेलवरून बाजू मांडणार

डॉ सुश्रुत घैसास काल मेडिकल कौन्सिल समोर सुनावणीला गैरहजर राहिले होते. डॉ डॉ सुश्रुत घैसास हे ईमेल वरून त्यांची बाजू मांडणार आहेत. डॉ सुश्रुत घैसास यांच्यासह दीनानाथ रुग्णालयातील चार जणांची सनद रद्द करावी ही भिसे कुटुंबियांची मागणी आहे.