सातारा : थंडीच्या दिवसांत सरतं वर्ष आणि नव्या वर्षाची नवी सुरुवात करण्यासाठी अनेक जण थंडीची मजा लुडता येईल अशी वेगवेगळी ठिकाणं शोधून काढतात... आणि फिरायला जाण्याचा प्लान बनवतात. अशा वेळी बहुतांश वेळा उत्तर भारताचा पर्याय पर्यटकांच्या डोक्यात येतो. पण, महाराष्ट्रवासियांनो यंदा तुम्हाला थंडीची मजा लुटण्यासाठी महाराष्ट्राबाहेर जाण्याची गरज लागणार नाही. कारण, राज्यातील काही भागांत पारा ३ अंशांपर्यंत खाली पोहचलाय... त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जाऊन थंडी एन्जॉय तर करू शकालच शिवाय यामुळे तुमच्या खिशावर त्याचा भारही पडणार नाही.
सातारा- महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर चांगलेच गारठले आहे. गेल्या दोन दिवसापासून तापमान कमी झाल्याने कडाक्याची थंडी जाणवत आहे. त्यामुळे वेण्णा लेक, लिंग मळा परिसरात दवबिंदू गोठून बर्फासारखी पांढरी चादर दिसू लागली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला राज्यातून तसेच परराज्यातून दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. या हिल स्टेशनला गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचे प्रमाण वाढलेलं दिसतंय. वेण्णा लेक, लिंग मळा परिसरात आज पारा ४ अंशापर्यंत खाली गेल्याने या ठिकाणी दवबिंदू गोठून बर्फ तयार झाला आहे. दरवर्षी डिसेंबर - जानेवारी दरम्यान हे हिमकण पहावयास मिळतात. लिंगमळा परिसरात छोट्या वनस्पतीवरचे दवबिंदू गोठले आहेत तर वेण्णालेक परिसरातील अनेक गाड्यांच्या टपावर असलेले दवबिंदू गोठले आहेत. आता या गुलांबी थंडी आणि हिम कणांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतील हे नक्की...
राज्यात प्रमुख्यानं उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम आहे. धुळ्यात आत पारा ३ अंशांपर्यंत खाली उतरलाय. तर निफाडमध्ये गुरुवारी १.८ अंशांपर्यंत खाली गेलेला पारा आज ४ अंशावर स्थिरावलाय. मनमाडमध्ये किमान तापमान ८ अंश नोंदवण्यात आलंय. जळगावत तापमानात ३ डिग्री अंश सेल्सियसनं घट झालीय. द्राक्षबागा वाचविण्यासाठी द्राक्षबागेत शेकोटी करावी लागत आहे तर रात्री द्राक्षबागेत पाणी सोडावे लागत आहे. याशिवाय सकाळी धुके पडत असल्याने द्राक्षबागेवर बुरशी येऊ लागलीय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय.
जळगाव तापमानाचा पारा ७ ते ८ अंशावर येऊन ठेपलाय. येत्या तीन चार दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढून तापमानाचा पारा ६ अंशावर जाईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जळगावात वाढत्या थंडीमुळ नागरिकांना घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा आश्रय घ्यावा लागतोय. वाढत्या थंडीमुळं रब्बीच्या गहू आणि हरभरा या पिकांना मात्र लाभ होताना दिसतोय. पश्चिम महाराष्ट्रात आज थंडीचा कडाका वाढलाय. अनेक ठिकाणी पारा पंधरा अंशांच्या खाली गेलंय.
धुळे - ३.२ अंश सेल्सिअस
निफाड - ४ अंश सेल्सिअस
नाशिक - ६.९ अंश सेल्सिअस
मनमाड - ८ अंश सेल्सिअस
अकोला - ८.५ अंश सेल्सिअस
परभणी - १० अंश सेल्सिअस
जालना - १२ अंश सेल्सिअस
बुलडाणा - १४ अंश सेल्सिअस
पुणे - १४.७ अंश सेल्सिअस
सोलापूर - १५ अंश सेल्सिअस