)
Maharashtra Weather : महाराष्ट्रात भयानक वातावरण पहायला मिळत आहे. संध्याकाळी 5 वाजता काळाकुट्ट अंधार पडला. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी पाच वाजताच्या समुरास मुंबईत मुसळधार पाऊस पडला. उन्हाळा, पावसाळा की हिवाळा काहीच समजेना अशी परिस्थिती झाली. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही पहायला मिळाला.
मोंथा असे या चक्रीवादलाचे नाव आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील 48 तासांत पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही समुद्रात सध्या हवामान सातत्याने बदलत आहे. त्यापैकी बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
मोंथा चक्रीवादळ वायव्येकडे सरकून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांना रेड अलर्ट, तर पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील 48 तासांत पुण्यासह राज्यभरात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. पुणे, मुंबई, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात वादळी वा-यावर जोरदार पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलीय. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि यवतमाळला पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळामुळे विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यताय. तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान, मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरीत पावसाला सुरुवात झाली आहे.