विशाल करोळे, झी मीडिया, लातूर : पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ मराठवाड्यातील ग्रामस्थ कर्नाटकात जायच्या तयारीत आहेत. लातूरच्या बोंबळी गावच्या(Bombli village of Latur) ग्रामस्थांनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. स्वतंत्र ग्रामपंचायत द्या अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकून आम्ही कर्नाटकात(Karnataka) सामील होऊ असा इशारा लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील बोंबळी( बुद्रुक) च्या गावकऱ्यांनी दिला आहे(Maharashtra Karnataka Border Dispute).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीदर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील मराठी भाषिक गावे वर्षानुवर्षे महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत राहिले. आजही त्या गावांचा व्यवहार महाराष्ट्रात अधिक आहे. दरम्यान, महाराष्ट्र-बेळगाव सीमाप्रश्न पेटल्यानंतर नवनवीन चर्चा समोर येत आहेत. अजूनही मराठी भाषिक गावे महाराष्ट्राशी जोडून राहू इच्छितात.मात्र, देवणी तालुक्यातील बोंबळी (बुद्रुक) येथील गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालेली नाही.


मूलभुत सुविधां, शासकीय योजनांसाठी भेदभाव केला जात असल्याचा आरोप बोंबळी ग्रामस्थ करत आहेत. स्वतंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही ग्रुप ग्रामपंचायत असलेली बोंबळी(बुद्रुक) आजही विकासापासून कोसोदूर आहे. रस्ते, पाणी या मूलभूत गरजा न पुरविल्याने ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करीत सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. 


जोपर्यंत गावात सेवासुविधा व सरकारच्या योजनांमधून विकास होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. याउलट कर्नाटक सरकार शेतकरी आणि गरीब जनतेसाठी चांगल्या योजना राबवीत आहे, असे सांगत ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.


काय आहेत बोंबळी ग्रामस्थांच्या मागण्या


  • पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, शाळेची उत्तम व्यवस्था करा.

  • कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मिळाले. आम्हालाही अनुदान उपलब्ध करून द्या. 

  • स्थानिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करा.

  • शेतीसाठी 10 एचपीपर्यंत मोफत वीज द्या, अशी मागणी बोंबळी(बुद्रुक) येथील ग्रामस्थानी केली आहे.