भारत पाकमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये जगभरातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला. मात्र तुर्कीयेनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. भारत आणि तुर्कीये या देशात अनेक व्यापार होतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आपल्या फळं बाजारात तुर्कीयेमधून सफरचंद येतात. भारताविरोधात पाकिस्तानला तुर्कीयेने साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सफरचंद व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीयेच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पाकिस्तानमधून या व्यापाऱ्यांनाच धमकीचे फोन येत आहेत.
तुर्कीये सफरचंदावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्याला धमकी
पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन
पाकड्यांच्या पोकळ धमकीविरोधात व्यापाऱ्यांचा संताप
युद्धाच्या रणांगणात सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आता कुरबु-या सुरू झाल्यात. पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कियेच्या सफरचंदांवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. पुण्यातून सुरू झालेली ही बहिष्काराची मोहीम आता देशभरात पोहोचलीये. तुर्कीयेची सफरचंद बॅन करून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला होता. आता ज्या व्यापाऱ्यांनी तुर्कीयेच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकलाय त्यांना थेट पाकिस्तानातून धमकीचे फोन येत आहेत. पाकिस्तानच्या या पोकळ धमक्यांचा सफरचंद व्यापाऱ्यांनी निषेध केलाय.
विशेष म्हणजे झी न्यूजचं लाईव्ह सुरू असतानाच धमकीचा कॉल आल्यानं व्यापारी आणखी चिडले आणि त्यांनी तिथेच तुर्कीयेची सफरचंद रस्त्यावर फेकून दिली. इतकंच नाही तर पाकिस्तान-तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या.
दरम्यान, फळ व्यापारी सुयोग झेंडे यांनी या धमकी कॉलबाबत पुणे पोलिसात रितसर तक्रार दिलीय. तसंच यापुढे फक्त सफरचंदच नाहीतर इतर तुर्की पदार्थांवरही बहिष्कार घालण्याची घोषणा करून टाकलीय. तुर्कीत जेव्हा भूकंप झाला तेव्हा भारतानं सर्वात मोठी मदत पाठविली होती पण, तुर्कीयेनं आपले उपकार विसरून शत्रूला मदत करून पाठीत खंजीर खुपसला.