मुंबई - भांडुपमध्ये 14 वर्षीय मुलाची हत्या, मृतदेह तलावात फेकला; आरोपींची ओळख पटल्यावर पोलिसांचाही विश्वास बसेना

Teens Kill 14-Year-Old Friend in Mumbai: मुंबईतील भांडुपमध्ये एका 14 वर्षीय मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह विहार तलावात फेकण्यात आला होता. मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचं भासवण्यासाठी मृतदेह तलावात फेकला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 2, 2026, 12:53 PM IST
मुंबई - भांडुपमध्ये 14 वर्षीय मुलाची हत्या, मृतदेह तलावात फेकला; आरोपींची ओळख पटल्यावर पोलिसांचाही विश्वास बसेना

Teens Kill 14-Year-Old Friend in Mumbai: मुंबईतील भांडुपमध्ये एका 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह तलावात फेकण्यात आला होता. मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचं भासवत पोलिसांनी दिशाभूल करण्यासाठी मृतदेह तलावात फेकला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. पण सर्वात हादरवणारी बाब म्हणजे, हत्या करणारे आरोपी तीन अल्पवयीन मुलं आहेत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

शवविच्छेदन अहवालामुळे मुलाचा बुडून मृत्यू झालेला नाही तर हत्या झाल्याचं उघड झालं. पीडित मुलाची ओळख पटली असून त्याचं नाव सिद्धार्थ लोंढे आहे. पोलिसांनुसार, त्याच्या फुफ्फुसात किंवा पोटात पाणी आढळलेलं नाही. यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला नसल्याचं उघड झालं. 

आरोपींचं वय 14 ते 15 दरम्यान आहे. तिन्ही आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यांची डोंगरी रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली. आरोपींपैकी एक सिद्धार्थचा वर्गमित्र होता, तर इतर दोघे भांडुपमधील दुसऱ्या शाळेतील आठवीचे विद्यार्थी होते. चारही मुले भांडुप पश्चिमेकडील एकाच परिसरात वास्तव्यास होती. 

हेदेखील वाचा - नाशिक - देवाच्या दारातच भक्ताला कपडे फाटेपर्यंत मारहाण, त्र्यंबकेश्वर मंदिरात लाथा बुक्क्यांनी तुडवलं, VIDEO व्हायरल

आठवीचा विद्यार्थी सिद्धार्थ, त्याच्या आईवडिलांसह आणि धाकट्या भावासोबत तुळशेत पाडा येथे राहत होता. त्याचे वडील अंधेरी येथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. 22 फेब्रुवारीला सिद्धार्थ दुपारी 3 वाजताच्या सुमारास जेवणानंतर घराबाहेर पडला होता. आपण खेळायला जात आहोत असं त्याने आई-वडिलांना सांगितलं होतं. संध्याकाळपर्यंत तो घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने शोध सुरू केला. शोध लागला नाही तेव्हा त्याने भांडुप पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांना विहार तलावाजवळ सिद्धार्थचं टी-शर्ट आणि चपला सापडल्या. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल असता तलवातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला बुडल्याचा संशय व्यक्त करत अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला. 

प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपी मुलांनी दावा केला की, आम्ही पोहायला गेलो होतो तेव्हा सिद्धार्थ बुडाला. आम्ही प्रयत्न केला, पण वाचवू शकलो नाही. पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा करत असल्याने त्यांना जाऊ दिलं. पण अहवाल आल्यानंतर त्यांच्या जबाबात आणि माहितीत साम्य नसल्याचं आढळलं. पोलिसांनी मुलांना पुन्हा बोलवलं आणि वेगवेगळी चौकशी केली. यादरम्यान त्यांनी सिद्धार्थची हत्या केल्याची कबुली दिली. 

हेदेखील वाचा - वहिनी पळून गेली, मूल भावाचं नाही... 13 महिन्यांच्या चिमुकलीचे 7 तुकडे करुन शेतात पुरले

 

पोलिसंच्या माहितीनुसार, ही मुलं सिद्धार्थवर नाराज होती आणि त्याला फार गर्व असल्याचं समजत होती. यामुळे त्यांनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला तलावाजवळ घेऊन गेले. त्यापैकी एकाने बांबूच्या काठीने त्याच्या पायावर वार केल्याचा आरोप आहे. सिद्धार्थ वेदनेने खाली वाकत असताना, दुसऱ्या मुलाने त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला काठीने वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

त्याचा श्वास बंद झाल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपी घाबरले. त्यांनी त्याचा टी-शर्ट आणि चप्पल काढून किनाऱ्याजवळ ठेवली आणि मृतदेह बुडून मृत्यू झाल्याचे भासवण्यासाठी तलावात फेकून दिला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More