Samruddhi Mahamarg Toll Hike: समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता समृद्धीवरील प्रवास महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 'समृद्धी'वरील पथकरात 19 टक्क्यांची वाढ केली आहे. 1 एप्रिलपासून ही टोलदरवाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळं आता वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी कार चालकांना 1,445 रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागणार आहे. नागपूर ते मुंबई या ७०१ किमी अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा मार्ग सुरू झाला आहे. तर येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित ७६ किमीचा मार्गही सेवेत दाखल होणार आहे. मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच 'एमएसआरडीसी'ने त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केली आहे
समृद्धी महामार्ग सुरू झाला तेव्हा डिसेंबर 2022 मध्ये टोल जर जाहीर करण्यात आला होता तेव्हा कार व हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोल आकारला जात होता. मात्र आता टोलमध्ये वाढ करण्यात आली असून १ एप्रिलपासून नवे टोलदर लागू होणार आहेत. 31 मार्च 2028 पर्यंत म्हणजेच तीन वर्षांसाठी हे नवे दर लागू असणार आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वाहनांचा प्रकार | सध्याचे दर | नवे दर |
कार, हलकी मोटार | 1080 | 1290 |
हलकी, व्यावसायिक, मिनी बस | 1745 | 2075 |
बस अथवा दोन आसांचा ट्रक | 3655 | 4355 |
तीन आसांची व्यावसायिक | 3990 | 4750 |
अवजड बांधकाम यंत्रसामुग्री | 5740 | 6830 |
अति अवजड वाहने | 6980 | 8315 |