महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात आठ पुजाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात आठ पुजाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू खाऊन थुंकल्याप्रकरणी मंदिर संस्थानाकडून या पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मंदिराची पवित्रता आणि शिस्त जपण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. या निर्णयानंतर मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, भक्तांकडून स्वागत करण्यात आलं आहे.
मंदिरातील काही पुजारी मंदिर परिसरात तंबाखू खाऊन थुकत अस्वच्छता करत होते. याप्रकरणी पुजाऱ्यांना नोटीस पाठवून कानउघडणी करण्यात आली होती. मात्र तरीही पुजाऱ्यांच्या वागण्यात बदल झाला नव्हता आणि अशोभनीय वर्तन सुरु होते. मात्र या नोटीशींना समाधानकारक उत्तर न दिल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचललं आहे.
सहा पुजाऱ्यांनी नोटीसीला उत्तर देऊन मंदिर संस्थानकडे माफीनामा सादर केला होता. यामध्ये लखन भोसले, अक्षय किशोर कदम भैय्ये, विशाल चव्हाण, धीरज चोपदार, वैभव भोसले, राहुल पवार यांचा समावेश आहे. माफीनामा देणाऱ्या सहा पुजाऱ्यांवर एक महिन्यासाठी प्रवेश बंदी घालण्यात आली आहे, तर नोटीशीला उत्तर न देणाऱ्या दोघांवर तीन महिन्याची मंदिर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. नोटीसला उत्तर न देणाऱ्यांमध्ये विशाल दादासाहेब मगर आणि विशाल बाळासाहेब गंगणे यांचा समावेश आहे.
अशोभनीय व मंदिराच्या शिस्तीस बाधा आणणं तसेच कायदा व सुव्यवस्थेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मंदिर संस्थांनाने देऊळ कवायत कायद्यानुसार कारवाई केली आहे.