'शरद पवारांचा आशीर्वाद असल्यानंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री'

नाना पटोले यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही शिवसेनेला टार्गेट करू लागले आहेत?

Updated: Jul 17, 2021, 09:20 PM IST
'शरद पवारांचा आशीर्वाद असल्यानंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री'

पुणे : 'शरद पवारांचा डोक्यावर आशीर्वाद असल्यानंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आहेत', असं विधान राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगावमध्ये पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याचं उदघाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी मित्रपक्षाला जोरदार चिमटे काढले. विशेष म्हणजे माजी खासदार शिवाजीराव अढळराव आणि कोल्हे यांच्या श्रेयवादात अडकलेल्या या कार्यक्रमाच्या फलकावर मुख्यमंत्र्यांचा फोटो टाळण्यात आला होता.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळाची भाषा करत असल्याने महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे. त्यातच आता खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचवाल्या आहेत. नाना पटोले यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही शिवसेनेला टार्गेट करू लागल्याचं यामुळे स्पष्ट झालं आहे. 

माजी खासदार आढळराव यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारीच खेड आणि नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन केले होते. यावरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आज रस्ता उद्घाटनप्रसंगी त्यांच्यावर टीका केली. 

महाराष्ट्र सरकारची, महाविकास आघाडीची, माननीय मुख्यमंत्र्यांची बाजू संसदेत अभिमानाने कोण मांडत हे तुम्हाला समजून जाईल आणि मग सांगा आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे किंवा नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामं, महाविकास आघाडीची कामं लोकांपर्यंत पोहचावीत यासाठी या अभियानाची सुरुवात केली. त्या अभियानाची काम सोडून आमच्यावर टीका करणं हाच एककलमी कार्यक्रम असेल आणि हा एककलमी कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर लपवला जात असेल तर प्रामाणिकपणे सांगतो 'माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आदर आहे. मात्र, मुख्यमंत्री या पदावर आहेत, कारण, आदरणीय पवारसाहेबांचा आशिर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. असं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. 

आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतात तो येणारा काळच ठरवेल.