कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शिवसैनिकांनी तोडफोड...'

Uddhav Thackeray on Kunal Kamra: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरने एकनाथ शिंदेंवर उपहासात्मकपणे टीका केल्यानंतर शिवसैनिक संतापले असून, वाद पेटला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 24, 2025, 02:27 PM IST
कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शिवसैनिकांनी तोडफोड...'

Uddhav Thackeray on Kunal Kamra: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) उपहासात्मकपणे टीका केल्यानंतर शिवसैनिक संतापले असून, वाद पेटला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, शिवसेना फुटीवर कुणाल कामराने (Kunal Kamra) गाण्याच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. यानंतर सत्ताधारी आमदारांकडून कुणाल कामराला अटक करण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील याची दखल घेतली असून कारवाईचा इशारा दिला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. 

"जे सत्य आहे ती जनभावना त्याने मांडली आहे. आम्ही आजही म्हणतोय की जे चोरी करतात ते गद्दार आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट करु इच्छितो की, कामराच्या येथे झालेली तोडफोड शिवसैनिकांनी केली नसून, शिवसेनेचा त्याच्याशी संबंध नाही. कदाचित ही गद्दारांच्या गटाने केली असेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले, "ही राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चाललेलं आहे की, गद्दारांच्या आदर्शाने चाललं आहे याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरुन त्यांच्या तथाकथित गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली. हे गद्दार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही. कोशारी यांनी अपमान केला तेव्हा त्यांचा निषेध करण्याचं धाडस नव्हतं. हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहे. त्यामुळे कुणाल कामराने अयोग्य केलं असं मला वाटत नाही. त्याने जनभावना व्यक्त केल्या आहेत".

"मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. नागपूरच्या दंगलीत ज्यांचं नुकसान झालं त्यांना तुम्ही नुकसान भरपाई देणार आहात. तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओचं ज्यांनी नुकसान केलं त्यांचीही भरपाई द्यायला हवी. तोडफोड करणारे जे भामटे, भेकड, गद्दार लोक आहेत त्यांच्याकडे दामदुपटीने वसुली करावी," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, "सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला असू शकत नाही. आम्ही तर उघडपणे हे गद्दार आहेत असं म्हणत आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य गद्दारांच्या बाबतीत म्हणू शकत नाही". 

"मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं राज्यात काही चालत नाही हे दाखवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो चिरडून काढला पाहिजे", असंही ते म्हणाले आहेत. 

कामरा नेमकं काय म्हणाला?

"महाराष्ट्राच्या निवडणुकीत यांनी काय केलं आहे पाहा. शिवसेना भाजपामधून बाहेर आली. मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून बाहेर आली. एका मतदाराला 9 बटणं दिली. सगळेच गोंधळून गेले. मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील एकाने सुरु केलं होतं," असं म्हणत कुणालने पुढे 'भोली सी सुरत, आँखो मे मस्ती' गाण्याच्या चालीवर एक गाणं सादर केलं. यामध्ये त्याने ठाण्यातील रिक्षा, चेहऱ्यावर दाढी, डोळ्यावर चष्मा असा उल्लेख गाण्यामधून केला आहे. तसेच पुढे बोलताना, "एक झलक दाखवून कधी गुवहाटीमध्ये लपले," असंही म्हटलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांबरोबर काही काळ गुवहाटीमध्ये वास्तव्यास असल्याचा संदर्भ यामधून देण्याचा प्रयत्न कामराने केला आहे. 

"पक्ष बदलणारी व्यक्ती"

याच गाण्याच्या चालीत कामराने, "माझ्या नजरेतून पाहिलं तर ती व्यक्ती गद्दार आहे," असंही म्हटलं आहे. "मंत्री नाही तर ती व्यक्ती पक्ष बदलणारी आहे, अजून काय सांगू?" असंही कामराने म्हटलंय. "ज्या थाळीत खाल्लं त्याच थाळीत त्यांनी छिद्र केलं," असंही कामराने या गाण्यात म्हटलं आहे. "राजकीय परिवारवाद संपवायचा होता म्हणून यांनी बाप चोरला असं यांचं राजकारण आहे," असं कामराने गाण्यात म्हटलं आहे.