Airtel Gallery Marathi Language: एअरटेल गॅलरीत महिला कर्मचाऱ्याने मराठी बोलण्यास नकार देत तरुणाशी वाद घातल्यानंतर पुन्हा एकदा भाषेचा मुद्दा तापला आहे. अंधेरीतील चारकोप येथे एअरटेलच्या गॅलरीत महिला कर्मचाऱ्याने मराठी तरुणाशी वाद घालताना आपण मराठीत बोलणार नाही अशी मुजोरी दाखवली. तरुणाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी एअरटेल प्रशासनाची भेट घेत मराठीवर असा भेदभाव केला तर यापुढे एकही गॅलरी दिसणार नाही असा इशारा दिला आहे.
एअरटेलच्या गॅलरीत आणि कॉलिंग यात मराठी पर्याय ठेवायला काही समस्या आहे का? मग नेमकी काय समस्या आहे की, एअरटेलच्या गॅलरीत मराठी बोलणारे तरुण किंवा तरुणी नसतात. यामागे काही तरी कारण आहे का? अशी विचारणा अखिल चित्रे यांनी एअरटेलच्या अधिकाऱ्याला केली. त्यावर संबंधित एअरटेलचा अधिकारी मराठी मुलं नाहीत असं नाही असं उत्तर देतो. त्यावर अखिल चित्रे त्यांना काल जो प्रकार घडला त्याची आठवण करुन देतात.
"मग काल जो प्रकार घडला त्या गॅलरीत एकही मराठी बोलणारा का नव्हता? एअरटेलच्या दिल्ली प्रशासनाची एकदा काचा फुटल्या होत्या तसं आंदोलन पुन्हा व्हावं अशी इच्छा आहे का?. एअरची टेल खेचून त्यांना खाली आणायचं आहे का?," अशी विचारणा ते करतात.
हवेत असलेल्या एअरटेलची टेल खेचण्यासाठी आम्ही @ShivSenaUBT_ शिवसैनिक आज एअरटेल मुंबई मुख्य कार्यालयात गेलो होता. मुंबईतील एअरटेल च्या कामकाजात मराठी नाही तर मुंबईत एअरटेलची गॅलेरी नाही. pic.twitter.com/B1IyHqfRk4
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) March 11, 2025
"फोन केल्यानंतर इंग्लिश, मराठीचा पर्याय निवडला तरी समोरची व्यक्ती हिंदीतच बोलते. हिंदी भाषिकांना नियुक्त केल्यामुळे मराठी मुलांना रोजगार मिळत नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त सबस्क्रिप्शन असताना, मराठी बोलणारे असंख्य ग्राहक असताना आम्ही मोहीम चालवावी असं वाटत आहे का? की दुसरं नेटवर्क घ्यावं अशी इच्छा आहे. मराठीवर असा भेदभाव केला तर यापुढे एकही गॅलरी दिणार नाही," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
व्हिडीओत मराठी तरुण एअरटेल गॅलरीत उभा असल्याचं दिसत आहे. आपण मागील अर्ध्या तासापासून येथे थांबलो असून, आपली समस्या सोडवली जात नाही. तसंच मराठीत बोलण्यास नकार देत उद्धटपणा केली जात असल्याची तक्रार तो व्हिडीओच्या सुरुवातीला करताना दिसतो. यानंतर व्हिडीओत महिला कर्मचारी आपण मराठीत बोलणार नाही असं सांगत वाद घालताना दिसत आहे.
एअरटेल प्रशासनाने नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं. महाराष्ट्रात एअरटेल चे असंख्य मराठी ग्राहक आहेत ते कायम ठेवायचे असतील तर योग्य पाउलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेल ची गॅलरी दिसणार नाही. इतर भाषेचा विरोध नाही पण मराठी भाषिक ८०% कर्मचारी असायलाच हवे.… pic.twitter.com/xRBO2nSzqh
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) March 11, 2025
व्हिडीओत तरुण सांगतो की, "मी इथे एअरटेल गॅलरीत आलो आहे. मला माझ्या समस्या सोडवून द्या म्हणून मी विनंती करत आहे. गेल्या अर्ध्या तासापासून मी बसलो आहे. मी मराठीत बोला सांगितल्यावर का मराठीत बोलू? तुम्हाला हिंदी येत नाही का? असं विचारत आहेत. मराठी बोलायला आलंच पाहिजे. मला पोलिसांची धमकी देत आहेत".
यानंतर व्हिडीओत महिला कर्मचारी दिसते. अरबाज सर, हा कस्टमर व्हिडीओ बनवत आहे. मला म्हणतो महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोला असं ओरडून सांगत आहे अशी तक्रार ती करते. यावेळी बाहेर उभा मुलगा मराठी येत नसेल तर? अशी विचारणा करतो. त्यावर तरुण त्यांना मराठी आलंच पाहिजे असं सांगतो. त्यावर महिला कर्मचारी त्याच्याशी वाद घालत का भाई, का मराठी आलं पाहिजे? असं कुठे लिहिलं आहे? मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असं कुठे लिहिलं आहे? अशी विचारणा करते. यादरम्यान तरुण तिला मला हात लावू नका बजावतो. त्यावर तीही मला तुला हात लावण्याची हौस नाही असं सांगते.
महिला कर्मचारी आरडाओरड करत असल्याने तरुण तिला आवाज कमी करा असं सांगतो. त्यावर ती मी असंच बोलणार असं उत्तर देते. हे तुमच्या मालकीचं आहे का? अशी विचारणा तरुण करतो. त्यावर ती मला मराठी समजत नाही, हिंदीत बोलायचं असं सांगते. त्यावर तरुण हिंदीत बोलण्यास नकार देत, मराठी समजून घ्यायचं असं सांगतो. त्यानंतर आपण भारतात राहतो, इथे कोणत्याही भाषेत बोलू शकतो असं सांगते. मॅनेजर आल्यानंतर महिला कर्मचाऱ्याची मुजोरी कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्रात मराठी महत्त्वाची नाही असं ती सांगताना दिसते.