'शिंदे महाराष्ट्रात चेष्टेचा विषय झालाय, भाजप आणि फडणवीस...'; ठाकरेंच्या सेनेचं विश्लेषण

UBT Reacts Kunal Kamra Song On Eknath Shinde: "शिंद्यांचे लोक कुणाल कामरावर हल्ला करतात, पण शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरविरोधात ‘ब्र’ काढायला तयार नाहीत."

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 26, 2025, 10:30 AM IST
'शिंदे महाराष्ट्रात चेष्टेचा विषय झालाय, भाजप आणि फडणवीस...'; ठाकरेंच्या सेनेचं विश्लेषण
ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशाणा

Kunal Kamra Controversy Latest News:  "टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे. टीकेचे नेहमीच स्वागत करायला हवे, असे पंतप्रधान मोदी यांनी आठ दिवसांपूर्वी सांगितले, मोदी यांचे शब्द हवेत विरण्याआधी विडंबन आणि टीका केल्याचे निमित्त करून मोदी समर्थक शिंदे गटाने एका ‘पॉडकास्ट स्टुडिओ’वर हल्ला केला. स्टुडिओ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यासपीठ उद्ध्वस्त केले. कुणाल कामरा या ‘पॉडकास्ट’ कलाकारास ठार मारण्याची धमकी दिली. मुंबई शहरात हे अराजक सुरू असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करीत होते व त्यांचे पोलीस काय करीत होते?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

हे चित्र भयंकर

"तोडफोड सुरू असताना पोलीस मूक दर्शक होते किंवा तोडफोड करणाऱ्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत होते. मोदी समर्थक शिंदे गटाने कामराच्या स्टुडिओची तोडफोड करताच मुंबई महापालिका जागी झाली व सुस्त पडलेले बुलडोझर घेऊन स्टुडिओवर पोहोचली. स्टुडिओतील अनेक कामे बेकायदेशीर असल्याचे ठरवून पालिकेने ती तोडली. स्टुडिओत चुकीचे काम झाले हे पालिकेला शिंद्यांवर टीका केल्यावर समजले, हासुद्धा विनोदच म्हणायला हवा. महाराष्ट्रासाठी हे चित्र भयंकर आहे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

फडणवीस यांच्या वाडवडिलांनी...

"कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर एक विडंबनात्मक काव्य सादर केले. अशा प्रकारच्या विडंबन काव्याने कोणाला का मिरच्या झोंबाव्यात व त्यासाठी मुंबईत दहशत निर्माण करून कायद्याचा मुडदा का पाडावा? मोदी म्हणतात, टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे. इथे लोकशाही आणि आत्मा दोन्ही पायदळी तुडवून मोदी समर्थकांनीच नंगानाच घातला आहे," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. "देवेंद्र फडणवीस हे एक हतबल गृहमंत्री आणि कमजोर मुख्यमंत्री आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पॉडकास्ट स्टुडिओवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्याचे सोडून गृहमंत्री कुणाल कामराला सांगतात, ‘‘शिंदे यांची माफी मागा व प्रकरण मिटवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे काही नाही.’’ फडणवीस यांच्या वाडवडिलांनी आणीबाणी काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध संघर्ष केला. आणीबाणीविरुद्ध हे लोक तुरुंगात गेले होते व इंदिरा गांधींविरुद्ध लढा पुकारला होता हे आता खरे वाटत नाही," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.

गुंडाराजला गृहमंत्री फडणवीस उघड समर्थन देत आहेत

"भाजपमधील ढोंगी मंडळी 26 जून हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करतात. कारण या दिवशी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली. या दिवशी स्वातंत्र्याच्या गळचेपीचे फर्मान जारी झाले असे या लोकांना वाटते. कामराचे प्रकरण पाहिल्यावर त्यापुढे भाजपने 26 जून ‘काळा दिवस’ पाळण्याचे ढोंग बंद केले पाहिजे व हा दिवस ‘ढोंग दिवस’ म्हणून पाळला पाहिजे. ‘माफी मागा व सुटा’ हे सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे धोरण दिसते. पॉडकास्ट करणाऱ्याने चुकीची व बदनामीकारक टीका केली असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई होऊ शकते, पण गुन्हा सिद्ध होण्याआधीच धमक्या, मारहाण, तोडफोड करणे हे गुंडाराज आहे. या गुंडाराजला गृहमंत्री फडणवीस उघड समर्थन देत आहेत," असा घणाघात अग्रलेखातून करण्यात आला आहे.

आत्रे, पाडगावकर आणि करंदीकरांची करुन दिली आठवण

"मराठी भाषेत व हिंदी साहित्यात विडंबनपर लेखनास आणि साहित्यास मोठी परंपरा आहे. हिंदीत हरिशंकर परसाई, शरद जोशी, सुरेंद्र शर्मा, संपत सरल यांनी विडंबनाची बहार उडवली. मराठीत आचार्य अत्रे, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, अशोक नायगावकर, महेश केळुस्कर अशांनी विडंबनात्मक काव्यलेखन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांनी तर अनेकांना गुदगुल्या आणि घायाळ केले, पण हे समजून घेण्याइतकी अक्कल आजच्या राजकारण्यांत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्र्यांच्या विडंबन बाणांनी स. का. पाटील, शंकर देव, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण यांना बेजार केले होते. म्हणून स. का. पाटलांनी अत्र्यांचा ‘मराठा’ प्रेस तोडायला गुंड पाठवले नव्हते," अशी आठवण ठाकरेंच्या सेनेनं सत्ताधाऱ्यांना करुन दिली आहे.

कोरटकरविरोधात ‘ब्र’ काढायला तयार नाहीत

"प्रश्न कुणाल कामराचा नसून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे काय? हा आहे. बीडमध्ये उघड खुनाखुनी सुरू आहे. नागपुरात औरंग्याच्या नावाने दंगल उसळली. महाराष्ट्रात त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पोलिसांना चकवा देऊन सुमारे महिनाभर गायब असतो. अखेर मंगळवारी तेलंगणातून त्याला नाइलाजाने पकडले जाते. हा काय प्रकार आहे? शिंद्यांचे लोक कुणाल कामरावर हल्ला करतात, पण शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरविरोधात ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. मग शिवरायांचा अपमान करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोरटकरला महाराष्ट्र सरकारने बहाल केले आहे काय?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

राज ठाकरेंचा उल्लेख

"मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले, ‘‘विधानसभेत बरेच ‘खोक्याभाई’ बसले आहेत.’’ हे विधान वास्तव दर्शविणारे आहे. पन्नास खोके घेऊन ज्यांनी पक्षांतर केले व त्याच खोक्यांच्या ताकदीवर निवडून आले त्या सगळ्यांना राज ठाकरेंनी ‘खोक्याभाई’ म्हटले. सरकार याच ‘खोक्याभाईं’चे आहे. आज ‘खोक्याभाई’ची उपमा दिली म्हणून शिंद्यांचे लोक राज ठाकरेंच्या घराकडे कूच करणार आहेत काय?" असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

नव्या बाटलीत जुनीच दारू

"महाराष्ट्रातला मोकळेपणा आणि पुरोगामी विचार गेल्या तीन वर्षांत पूर्ण संपविण्यात आला. सर्वांवर करडी नजर ठेवणारी सरकारी यंत्रणा भाजपने उभी केली आहे. सर्व विरोधक आणि टीकाकारांवर पाळत ठेवली जात आहे. विरोधकांचे फोन ऐकले जात आहेत, ही आपल्या लोकशाहीची सध्याची तऱ्हा आहे. महाराष्ट्रात लोकशाही आणि स्वातंत्र्याचा मुडदा अशा पद्धतीने पाडला जाईल, असे वाटले नव्हते. कुणाल कामराच्या निमित्ताने तो पाडला गेला. महाराष्ट्रात चाळीस आमदारांनी गद्दारी केली व एक घटनाबाह्य सरकार बनवले. त्या कटात आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी होते. त्यावर प्रचारात राळ उठली. सुप्रीम कोर्टबाजी झाली. खोक्यांवरच्या घोषणा गाजल्या. कुणाल कामराने विडंबन गाण्यात हेच सांगितले. त्यामुळे त्यात नवीन काय? नव्या बाटलीत जुनीच दारू आहे. त्या जुन्या दारूची नशा शिंदेंच्या लोकांना अशी चढली की, त्यांनी कामराच्या स्टुडिओवर हल्ला केला," असं लेखात म्हटलं आहे.

हे बरे नाही

"टीका सहन करण्याची हिंमत नसलेल्यांचे पाय लटपटू लागल्याचे हे चिन्ह आहे. फडणवीस यांना हवे ते घडत आहे. शिंदे यांचे लटपटणे फडणवीसांच्या पथ्यावर पडत आहे. कामरा प्रकरणात शिंदे हे पुरते बदनाम झाले. कामराने शिंद्यांची माफी मागावी असे फडणवीस म्हणतात. फडणवीस व त्यांचे लोक शिंद्यांना हलक्यात घेत आहेत आणि पडद्यामागून टपल्या-टिचक्या मारीत आहेत. शिंदे म्हणजे महाराष्ट्रात चेष्टेचा विषय बनला आहे. भाजप आणि फडणवीस मजा घेत आहेत. या चेष्टेखोरीत महाराष्ट्रही हास्यास्पद ठरला, हे बरे नाही," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.