Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबातील तीन व्यक्तींना ताब्यात घेतलं असून दोन व्यक्ती म्हणजे सासरे आणि दीर फरार आहेत. राजेंद्र हगवणेंच्या सख्ख्या भावाला ताब्यात घेण्यात आलंय. याप्रकरणी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. वैष्णवी हगवणेला त्रास देणाऱ्या नणंद करिश्माचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आलेयत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी करिश्माचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर खळबळ उडालीय. या फोटोमध्ये करिश्मा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसतायत. सुनेत्रा पवार यांच्यासोबत तर करिश्मा एका उद्घाटन कार्यक्रमात दिसतायत.
करिश्मा हगवणे बरोबर सुनेत्रा पवार? ह्याच करिश्मा हगवणे बरोबर सुप्रिया सुळे आणि शरद पवार पण आहेत? हे पण वरवरचे संबध आहेत का? एका लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचांड लागलं? असे अजित पवार म्हणतात. इतक्या गंभीर विषयावर अशी भाषा ? संवेदनशील असू शकत नाहीत हे? असे प्रश्न विचारत अंजली दमानियांनी टीका केलीय.
वैष्णवीची मोठी जाऊ असलेल्या मयुरीनं पत्रकार परिषद घेत नणंद करिश्माबद्दल धक्कादायक खुलासे केले. 'आमच्या बाबतीतले सगळेच निर्णय नणंद घेत होती. नणंद करिश्मा जिला सर्वजण पिंकी ताई म्हणतात. घरात भाजी कोणती करायची, मी आणि वैष्णवीने कोणत्या साड्या नेसायच्या, याचे निर्णयदेखील नणंदच घेत होती, असे मयुरीने सांगितले. पिंकी म्हणेल तीच पूर्व दिशा अशी घरात परिस्थिती असल्याचेही तिने पुढे सांगितले.
करिश्मा हगवणे बरोबर सुनेत्रा पवार?
ह्याच करिश्मा हगवणे बरोबर सुप्रिया सुळे आणि शरद पवार पण आहेत?
हे पण वरवरचे संबध आहेत का?
आज अजित पवार म्हणतात एका लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचांड लागलं? इतक्या गंभीर विषयावर अशी भाषा ? संवेदनशील असू शकत नाहीत हे?
धक्कादायक pic.twitter.com/a719tBvog5
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 22, 2025
घरातील सुसांनी काय खायचं, कोणते कपडे घालायचे, याचे निर्णय करिश्माच घ्यायची. घरातील सगळे व्यवहारदेखील करिश्मा हगवणे पाहत असल्याचा आरोप मयुरीने केला. हगवणे घरात करिश्माची सत्ता होती. करिश्मानं लग्न केलं नसून तिला लग्न करायची इच्छा नाही. हगवणे कुटुंबावर तिला कायमस्वरुपी नियंत्रण हवंय. करिश्मा दोन्ही भावांपेक्षा 5 असून भावांच्या संसारात तिची कायम लुडबूड चालत असल्याचा आरोप मयुरीने केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधान पोलीस ठाण्यात छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी, वैष्णवीने 16 मे रोजी स्वत:ला खोलीत बंद करुन घेतलं होतं. काही वेळाने पती शशांकने दरवाजा ठोठावला. आतून काहीच उत्तर न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. यानंतर तिने आत्महत्या केल्याचं उघड झालं. वैष्णवीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दरम्यान राजेंद्र हगवणे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष असल्याने त्यांना अटक होत नसल्याचा आरोप पिंपरी चिंचवडचे पोलीस अधिकक्ष सुनील कुऱ्हाडे यांनी फेटाळला आहे. पोलिसांची तीन पथकं त्यांच्या शोधात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचं, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळं सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दिराविरोधात गुन्हा दाखल आहे. पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आलीये तर सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरु आहे असं त्यांनी सांगितलं आहे.
हगवणे मृत्यू प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना निष्पक्ष व वेळेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तत्काळ अटक करावी, असेही निर्देश दिले असून, तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.