Vaishnavi Hagawane Death Case: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची सून वैष्णवी हगवणेने (Vaishnavi Hagawane) आत्महत्या केल्यानंतर तिचा शवविच्छेदने अहवाल समोर आला आहे. यामध्ये शरीरावर अनेक बोथट जखमा आढळून आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच मानेच्या अस्थिबंधन दाबामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील एक्सवर हा अहवाल शेअर केला आहे. तसंच अजित पवारांना वैष्णवीला न्याय देणार का? अशी विचारणा केली आहे.
"जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या /आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार ? अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात.पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार?," असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
वैष्णवीने आपल्या मैत्रिणीला फोन करुन सासरी किती त्रास होत आहे याची माहिती देत व्यथा मांडली होती. हा फोन कॉलही समोर आला आहे. यामध्ये तिने ज्याच्यासाठी सर्वांचा विरोध पत्करुन लग्न केलं तो पतीही साथ देत नसल्याने खंत व्यक्त केली.
"तुझ्या मैत्रिणींना तू किती घाणेरडी आहेस हे सांगते. तू शशांकसोबतही कधी एकनिष्ठ राहिली नाहीस. तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे. घाण शिव्या देऊ लागली. आईला, पप्पांना काहीही बोलू लागली. मगाशी पप्पा, मम्मी बसले होते त्यामुळे मला बोलता आलं नाही. डॅडी मला मारताना पाहत होते. नंतर त्यांनीही माझ्यावर हात उचलला. त्यांनाही खरं वाटलं आहे," असं वैष्णवी फोनवरुन मैत्रिणीला सांगते.
पुढे ती सांगते, "पप्पा मला यावर विचार करु म्हणालेत. माझा नवराच माझ्याकडे आला नाही याचं जास्त वाईट वाटत आहे. सासू सासऱ्यांचं असं वागण्याचं काम असतं. पण ज्याच्यामुळे मी त्या घऱात गेले, लय चुकलं माझं. सर्वांना विरोध करुन लग्न केलं तिथंच चूक झाली माझी. सगळं बोलणं, समजण्यापलीकडे गेलं आहे. तुला ही छोटी गोष्ट वाटते का? माझ्या आयुष्यात विचारही केला नव्हता. मला इतकं घाण बोललेत, शिव्या देत असतात".
आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचं, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळं सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दिरेवर गुन्हा दाखल आहे. यापैकी पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आलीये तर सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरु आहे.
एकीकडे पोलिस राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू असल्याचा दावा करत असताना वैष्णवी यांच्या कुटुंबीयांनी मात्र हगवणे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अजित पवार हे स्वतः वैष्णवीच्या लग्नात होते, त्यांनी आशीर्वादही दिले होते. दादांनी लाडक्या बहिणीला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन चांदीची भांडी देण्यात आली. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला होता. तसंच पती शशांक हा चारित्र्यावरून संशयही घेत होता. वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं राजेंद्र हगवणेंची लहान सून वैष्णवीचा जीव गेला. अगदी असंच काहीसा मोठ्या सुनेचाही छळ हगवणे कुटुंबीयांनी केला होता. नोव्हेंबर 2024मध्ये तिने पौड पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हाही दाखल केला आहे.