...म्हणून 2 वर्षांपूर्वी वैष्णवीने गरोदरपणात केलेला आत्महत्येचा प्रयत्न; आई-वडिलांना 'हे' टाळता आलं असतं

Vaishnavi Hagwane Case History: वैष्णवीने 16 मे रोजी स्वत:ला संपवलं. मात्र आता या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाची क्रूर कारस्थानं समोर येत असतानाच नवा खुलासा पुढे आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 24, 2025, 01:16 PM IST
...म्हणून 2 वर्षांपूर्वी वैष्णवीने गरोदरपणात केलेला आत्महत्येचा प्रयत्न; आई-वडिलांना 'हे' टाळता आलं असतं
समोर आला नवीन खुलासा (फाइल फोटो)

Vaishnavi Hagwane Case History: पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीच्या सासरच्या सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणात फरार निलेश चव्हाणचा शोध घेत आहेत. याच दरम्यान वैष्णवीवर हगवणे कुटुंबाने केलेल्या अत्याचाराबद्दलचा धक्कादायक तपशील टप्प्याटप्प्यात समोर येत असतानाच आता वैष्णवीने दोन वर्षांपूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं त्यावेळेस घडलेलं काय ते जाणून घेऊयात...

2023 मध्येही केलेली आत्महत्येचा प्रयत्न

हुंड्यासाठी अमानुष छळ सहन करून अखेर नऊ महिन्याच्या तान्हुल्याला पाठीमागे ठेवत वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी जगाचा निरोप घेतला. या प्रकरणाचा तपशी समोर आल्यानंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सासरच्या सर्वांना पोलिसांनी अटक केल्याने काही प्रमाणात समाधान मिळालं असलं तरी आता वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. त्यावेळी दुसरीकडे वैष्णवी प्रकरणामध्ये यंत्रणांनी वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर वैष्णवीचा जीव वाचला असता का अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. त्याला कारणही तसंच आहे. वैष्णवीने गरोदर असताना 27 नोव्हेंबर 2023 रोजीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पुढे आली आहे.

वैष्णवी कीटकनाशक प्यायली पण...

वैष्णवी गरोदर असताना तिच्यावर हगवणे कुटुंबीयांनी अमानुष अत्याचार केले. तिचा छळ करत तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. पती शशांक याने हे मुल माझे नसल्याचे सांगत वैष्णवीला घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर निराश झालेल्या वैष्णवीने कीटकनाशकाचं प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वैष्णवीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर तिचे प्राण वाचले होते. त्यानंतरही वैष्णवीला सासरी पाठवण्यात आलं. मुलाच्या जन्माने घरातील वातावरण बदलेल या आशेवर असलेल्या वैष्णवीचे सासरच्यांकडून छळ सुरूच राहिला. अखेर वैष्णवीने 16 मे रोजी गळफास घेत आत्महत्या केली.

आई-वडिलांनी ही काळजी घेणं गरजेचं

वैष्णवीन 2023 मध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला असताना काही पावलं उचलली असती तर तिचा प्राण वाचला असता. वैष्णवीच्या आई वडिलांनी वेळीच तिच्या वेदना समजल्या असत्या, समाजाच्या भीतीने तिला सासरी पाठवले नसते तर कदाचित आज वैष्णवी तिच्या तान्हुल्या बरोबर खेळू शकली असती. वैष्णवीच काय पण आज अनेक विवाहित मुली समाजाच्या भीतीनं आपल्यावर होत असलेला अन्याय सांगत नाहीत. मुलगी माहेरी आली तर समाज काय म्हणेल या भीतीने आई-वडील ही मुलीची बाजू समजून घेत नाहीत आणि त्यातूनच वैष्णवीसारख्या मुली टोकाचा निर्णय घेतात. त्याचमुळे मुलीचा जीव महत्वाचा की खोटी सामाजिक भीती हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.