पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमात वाल्मिक कराडचं बॅनर झळकलं, काय आहे नेमकं प्रकरण?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात गजाआड असणा-या गुंड वाल्मिक कराडच्या समर्थकांचा माज काही उतरताना दिसत नाही आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 6, 2025, 09:58 PM IST
पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमात वाल्मिक कराडचं बॅनर झळकलं, काय आहे नेमकं प्रकरण?

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे बॅनर झळकलं होतं. दरम्यान यानंतर पुन्हा एकदा वाल्मिक कराडचे दोन बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका बॅनर वाल्मिक कराडला मदत करा म्हणून आवाहन करण्यात आलंय. बॅनरवर
स्कॅनर देखील देण्यात आलं आहे. पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे.

Add Zee News as a Preferred Source

संतोष देशमुख हत्या प्रकरणात गजाआड असणा-या गुंड वाल्मिक कराडच्या समर्थकांचा माज काही उतरताना दिसत नाही आहे. कारण बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून त्याचे बॅनर व्हायरल करण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून वाल्मिक कराडला मदत करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर दुस-या बॅनरवर मात्र
दसरा मेळाव्यात येणा-यांसाठी मदत करा असा आशय आहे.

वाल्मिक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मिक आण्णाचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा. तेव्हाच आण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील.. थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी असा आशय व्हायरल झालेल्या पहिल्या बॅनरवर आहे.

तर दुस-या बॅनरवर भव्य दसरा मेळावा वाल्मिक अण्णा कराड मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दसरा मेळाव्यासाठी भगवान भक्ती गड येथे येणा-या जनतेसाठी अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचं योजिले आहे.. तरी आपण सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी देऊन सहकार्य करावे. 

वाल्मिक कराडला सतत चर्चेत ठेवण्यासाठी किंवा वाल्मिक कराडचं अस्तित्व अजूनही आहे. हे दाखवून देण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.  या व्हायरल बॅनरवर संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे.. या प्रकरणी आता अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान व्हायरल बॅनर आणि बॅनर बनवणा-या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिका-यांना दिलीय. दरम्यान या प्रकरणी कारवाई न झाल्यास गुन्हेगारीचं उदात्तीकरणाला आणखीन बळ मिळणार.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये आहे. दरम्यान त्याच्या समर्थकांकडून अजूनही वारंवार मारहाण, दादागिरी आणि मुजोरी पाहायला मिळतेय.. पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात देखील वाल्मिक कराडचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बॅनरची देखील
जोरदार चर्चा सुरूय. त्यामुळे या प्रकरणी पोलीस आता कोणती अॅक्शन घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More