गणेश मोहळे, झी 24 तास, वाशिम: आयुष्यात आपण भविष्याविषयी अनेक गोष्टी ठरवत असतो. पण विविध कारणांमुळे त्यातल्या काहीच गोष्टी पूर्ण होतात. न पूर्ण झालेल्या गोष्टींवर काही ना काही पर्याय काढून पुढे जाण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. अशीच एक कहाणी समोर आली आहे. ज्यामध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या तरुणाने शेतकरी बनून उत्तम आयुष्य घडवले आहे.
वाशीमच्या रिसोड तालुक्यातील घोनसर गावाच्या विलास जाधव या अल्पभूधारक शेतकऱ्याची ही प्रेरणादायी कहाणी आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विलास जाधव हे सीताफळ शेतीतून लाखोंचं उत्पादन घेत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय. विलास जाधव यांच्याकडे अवघी अडीच एक्कर शेती आहे. यापूर्वी त्यात ते सोयाबीन,गहू हरभरा असे पारंपरिक पिकं घेत होते.मात्र त्यात नफा कमी अन खर्चच अधिक अशी परिस्थिती होती. त्यामुळे त्यांनी तीन वर्षापूर्वी फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी कमी पाण्यात येणाऱ्या सीताफळाची निवड करून शासनाच्या रोजगार हमी योजनेतून 1 लाख 35 हजाराचे अनुदान घेत फळबाग लावली.


यावर्षी त्यांचा पहिला तोडा झाला असून त्यातून त्यांना १लाख रुपयाचं उत्पन्न मिळालंय. आणखी दोन तोडे होणार असून त्यातून दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.


शिक्षक व्हायचं होतं पण...


विलास जाधव हे उच्च शिक्षित आहेत. सुरुवातीला त्यांचा शेतीकडे कल नव्हता. शिक्षक व्हायचं स्वप्न त्यांना झोपू देत नव्हतं. मात्र परिस्थिती साथ देत नव्हती. त्यांच्यावर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या एकामागोमाग एक येऊ लागल्या होता. पैश्यांअभावी त्यांचं स्वप्न अधुरं राहील आणि शिक्षक होण्याच्या स्वप्नाला त्यांना मुरड घालावी लागली. त्यांनी आपलं पूर्ण लक्ष सीताफळ शेतीकडे वळवलं असून यात ते समाधानी असल्याचं सांगतात. शिवाय इतर शेतकऱ्यांनाही फळबाग लागवड करावी असा सल्लाही ते इतर शेतकऱ्यांना  देतात. एखादी गोष्ट आपण करायची ठरवली, त्यासाठी मेहनत घेतली, सातत्य ठेवलं तर अशक्य असं काहीच नाही, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.