)
मुंबई : LIC ने आपल्या गुंतवणूकदारांचा 33 हजार कोटींचा निधी अदानी समूहासाठी वळवल्याचा दावा अमेरिकन वृत्तपत्र वाशिंग्टन पोस्टने केलाय. वॉशिंग्टन पोस्टच्या या खळबळजनक दाव्यानंतर देशात मोठा भूकंप झालाय. नेहमीच गुंतवणूकदारांच्या हितासाठी कटिबद्ध असलेली LIC नव्या आरोपामुळे मोठ्या वादात सापडलीय. विरोधकांनीही यावरून LICसह सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात.
जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी जाहिरातीमुळे देशभर लोकप्रिय ठरलेली LIC सध्या वॉशिंग्टन पोस्टच्या एका दाव्यामुळे वादात सापडली आहे. त्यामुळे अगदी डोळे झाकून LICमध्ये गुंतवणूक करणारी सर्वसामान्य जनता काहीशी बुचकळ्यात पडली आहे. अडचणीतील अदानी समूहाच्या मदतीसाठी LICने 33 हजार कोटींचा निधी वळवल्याचं वृत्त द वॉशिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केलंय. अनेक सरकारी आणि बिगर सरकारी आजी-माजी अधिका-यांशी बोलून हे वृत्त दिल्याचं या दैनिकांनं सांगितलंय.
-अदानी समूहावर कर्ज वाढल्यानं अमेरिका, युरोपियन बँकांचा कर्ज देण्यास नकार
-अमेरिकेतील आरोपानंतर अदानींना 33 हजार कोटींच्या मदतीची भारताची योजना
-भारतीय अधिका-यांनी अदानी समुहाला LICच्या गुंतवणुकीची योजना तयार केली
-मे महिन्यात DFS, LICची 33 हजार कोटींची गुंतवणूक योजनेला मंजुरी
-इतर गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अदानी समुहात गुंतवणुकीची रणनीती
वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्यानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकारने देशाची संपूर्ण संपत्तीचं अदानींच्या पायाशी ओतली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर हा प्रकार म्हणजे गोरगरिबांना अंधा-या खाईत लोटण्याचा प्रकार असल्याचा घणाघात काँग्रेसने केला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्यानंतर देशात गोंधळ उडाल्यानंतर LIC नं स्पष्टीकरण दिलंय. तसेच वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्यात कुठलंही तथ्य नसल्याचं सांगितलंय.
LIC ची गुंतवणूक पूर्ण खबरदारी घेऊन सुरक्षितपणे केली जाते. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार अदानी समूहात कोणतीही गुंतवणूक नाही. वृत्तातील दस्तऐवजांनुसार कोणतीही योजना LICनं तयार केलेली नाही. LICची स्वच्छ प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनं हा रिपोर्ट प्रसारित करण्यात आलेला आहे. भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठीच हे वृत्त दिल्याचं LICनं म्हटलं आहे. दरम्यान याबाबत सत्ताधारी भाजपनेही या दाव्यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं सांगत चर्चा फेटाळून लावल्या आहेत
'तुमचे कल्याण हीच आमची जबाबदारी' घोषवाक्य असलेल्या LICने अदानींच्य़ा कल्याणासाठी गुंतवणूक केल्याच्या दाव्याने देशात एकच वादळ उठलंय. LICने त्याबाबत स्पष्टीकरण देत आरोपांचं खंडनं करत गुंतवणूकदारांना आश्वासितही केलंय. मात्र असं असले तरी सर्वसामान्यांच्या मनातील संशयांचं काहूर शमेपर्यंत काही काळ लागणार आहे.
वॉशिंग्टन पोस्टने LICबद्दल नेमकं काय दावा केला आहे?
उत्तर: वॉशिंग्टन पोस्टने दावा केला आहे की, LICने आपल्या गुंतवणूकदारांचा ३३ हजार कोटी रुपयांचा निधी अदानी समूहासाठी वळवला. अमेरिका आणि युरोपियन बँकांनी अदानी समूहाच्या वाढत्या कर्जामुळे आणि अमेरिकेतील आरोपांमुळे कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर, भारतीय अधिकाऱ्यांनी अदानी समूहाला LICच्या गुंतवणुकीची योजना तयार केली. मे महिन्यात DFS (Department of Financial Services) आणि LICने या ३३ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली, जेणेकरून इतर गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळेल.
विरोधकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: विरोधक आक्रमक झाले. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले, सरकारने देशाची संपूर्ण संपत्ती अदानींच्या पायाशी ओतली. काँग्रेसने घणाघात करत म्हटलं, हा प्रकार गोरगरिबांना अंधारात लोटण्याचा आहे. यामुळे राजकीय वाद तापला.
LICने या दाव्याला कसं उत्तर दिलं?
उत्तर: LICने आरोप फेटाळले. LICची गुंतवणूक पूर्ण खबरदारी घेऊन सुरक्षितपणे केली जाते. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार अदानी समूहात कोणतीही गुंतवणूक नाही आणि दस्तऐवजानुसार कोणतीही योजना तयार केलेली नाही. हा रिपोर्ट LICची स्वच्छ प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी प्रसिद्ध केला गेला, असं LICने स्पष्ट केलं. गुंतवणूकदारांना आश्वासनही दिलं.