मुंबई :  मुलांनी अष्टपैलू असावं असं प्रत्येकाच्या पालकांना वाटते. त्यावर खरी उतरत आहे ही ओवी. ही ओवी... पेटी वाजवते, बासरीही वाजवते, अभ्यासही करते  पण ओवीचा सगळ्यात मोठं यश म्हणजे ती सगळ्यात लहान वयाची ओपन वॉटर डायव्हर आहे.  ओवी अवघ्या बारा वर्षांची आहे. ओवीनं थायलंडमध्येही ओपन वॉटर डायव्हिंग केलं आहे, हे सगळं करुनही ओवी गप्प बसली नाही तर ओपन वॉटर डायव्हिंगची तिच्यासारख्या लहान मुलांना माहिती व्हावी यासाठी तिनं वडिलांची मदत घेत पुस्तकही लिहिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WE CAN, IF YOU WILL, असं तिच्या पुस्तकाचं नाव आहे. यात स्कुबा डायव्हिंगची तर माहिती आहेच, त्याचबरोबर चौकटी मोडून नवी आव्हानं कशी स्वीकारता येतील, हे सांगण्याचाही ओवीचा प्रयत्न आहे.  महत्त्वाचं म्हणजे ओवीचं WE CAN, IF YOU WILL, हे पुस्तक  स्पोर्ट्स अँड अँडव्हेन्चर या प्रकारात अॅमेझॉनवर बेस्ट सेलर ठरलं आहे. एवढंच नव्हे तर ग्लोबल रेकॉर्ड्स आणि रिसर्च फाऊण्डेशननं सर्वात लहान क्रीडा लेखिका म्हणून ओवीचा गौरव केला आहे. 


बारा वर्षांची ओवी अभ्यासही करते, वादनही करते, स्वीमिंगही करते आणि ओपन वॉटर डायव्हिंगही करते. आणि पुस्तकही लिहिते.  मनात आणलं आणि ठरवलं तर अभ्यास सांभाळून असं बरंच काही तुम्हीही करु शकता.  चौकटी मोडून आव्हानं स्वीकारणाऱ्या ओवीचं कौतुक.