)
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुजरातच्या वनताराला नेण्यात आलं. महादेवीला गुजरातला नेण्याच्या घटनेनंतर आता चर्चा सुरू झालीय ती दख्खनचा राजा जोतिबाचा सुंदर हत्तीची. पेटाच्या तक्रारीनंतर आणि कोर्टाच्या आदेशानंतर 2014 ला जोतिबाच्या सुंदर हत्तीला कर्नाटकमधील बाणेरगट्टा अभयारण्यात हलवण्यात आलं होतं. पुढे जोतीबाच्या सुंदर हत्तीचं काय झालं? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पाहुया त्यासंदर्भात एक स्पेशल रिपोर्ट.
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुजरातच्या वनताराला नेण्यात आलं आणि त्यानंतर चर्चा सुरू झालीय ती म्हणजे दख्खनचा राजा जोतीबाच्या सुंदर हत्तीची. जोतीबाच्या सेवेसाठी वारणा उद्योग समुहाने मंदिर संस्थानला 2004 पूर्वी सुंदर हत्ती भेट दिला होता. मात्र दरम्यानच्या काळात सुंदरला चांगली सोय मिळत नाही, माहुताकडून सुंदर हत्तीला मारहाण केली जात असल्याची तक्रार पेटाने कोर्टात केली. पेटाच्या तक्रारीनंतर सुंदर हत्तीची जंगलात रवानगी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. याविरोधात विनय कोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जून 2014 साली सुंदर हत्तीला कर्नाटकच्या बाणेरगट्टा अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले. यावेळीही जोतीबाच्या भक्तांच्या जनभावना प्रचंड दुखावल्या होत्या. सुंदर हत्ती जोतीबाचा डोंगर सोडून जायला तयार नव्हता असा दावा विनय कोरे यांनी केलाय आहे.
पेटाच्या तक्रारीनंतर आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जोतीबाच्या सुंदर हत्तीला कर्नाटकच्या बाणेरगट्टा अभयारण्यात हलवण्यात आलं. मात्र या अभयारण्यात नेल्यानंतर अवघ्या काही वर्षातच जोतीच्या सुंदर हत्तीचा मृत्यू झाला.
सुंदर हत्तीची चांगली देखभाल होत नाही म्हणून कोर्टात जाणाऱ्या पेटावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी निशाणा साधला आहे. बाणेरगट्टा अभयारण्यात गेल्यानंतर सुंदर हत्तीचा मृत्यू झाला. जोतिबाच्या सुंदर हत्तीच्या मृत्यूला पेटाच जबाबदार असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
जोतिबाच्या सुंदर हत्तीला बाणेरगट्टा अभयारण्यात हलवत असताना सुंदरच्या पायाला जखमा झाल्या. तरीदेखील सुंदरला जबरदस्तीने बाणेरगट्टा अभयारण्यात हलवल्याचा आरोप आहे. त्याच हत्तीचे निधन झाल्यानंतर पेटाने काय भूमिका घेतली.? सुंदरच्या मृत्यूच्या कारणाचा पेटाने शोध घेतला का? असे प्रश्न कोल्हापूरकर आता उपस्थित करत आहेत आणि त्यामुळे पेटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
FAQ
1) जोतीबाच्या सुंदर हत्तीचं काय झालं?
जोतीबाच्या मंदिरासाठी वारणा उद्योग समुहाने २००४ पूर्वी भेट दिलेल्या सुंदर हत्तीला पेटाच्या तक्रारीनंतर २०१४ मध्ये कर्नाटकच्या बाणेरगट्टा अभयारण्यात हलवण्यात आलं. मात्र, काही वर्षांतच तिथे सुंदरचा मृत्यू झाला.
2) सुंदर हत्तीला बाणेरगट्टा अभयारण्यात का पाठवण्यात आलं?
पेटाने सुंदर हत्तीची योग्य देखभाल होत नसल्याचा आणि माहूताकडून मारहाण होत असल्याचा आरोप कोर्टात केला. यावर मुंबई उच्च न्यायालयाने सुंदरला बाणेरगट्टा अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले, जे सर्वोच्च न्यायालयाने जून २०१४ मध्ये कायम ठेवले.
3) सुंदर हत्तीच्या मृत्यूचं कारण काय होतं?
सुंदर हत्तीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट नाही. मात्र, बाणेरगट्टा अभयारण्यात हलवताना त्याच्या पायाला जखमा झाल्याचा आणि जबरदस्तीने हस्तांतरण केल्याचा आरोप आहे. पेटाने याबाबत कोणताही तपास केल्याचा उल्लेख उपलब्ध माहितीत नाही.
4) कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीच्या प्रकरणाचं काय झालं?
महादेवी हत्तीण, जी नांदणी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात ३४ वर्षांपासून होती, तिला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २८ जुलै २०२५ रोजी गुजरातमधील जामनगर येथील वनतारा पशु कल्याण केंद्रात हस्तांतरित करण्यात आलं.